Rakesh Pandey Passed Away : ज्येष्ठ अभिनेते राकेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी २१ मार्च २०२५ रोजी सकाळी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील जुहू येथील आरोग्यनिधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
राकेश पांडे हे ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या मुलीने दिली आहे. आज (२२ मार्च रोजी) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राकेश पांडे यांची मुलगी जसमीत हिने वडिलांच्या निधनाची पुष्टी केली.
एबीपी न्यूजला माहिती देताना जसमीतने सांगितलं की गुरुवार आणि शुक्रवारी (२०-२१ मार्च) पहाटे तीन वाजता तिच्या वडिलांनी अस्वस्थ वाटतंय व छातीत दुखतंय अशी तक्रार केली होती. नंतर त्यांना तातडीने आरोग्य निधी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. शुक्रवारी सकाळी ८.५१ वाजता त्यांचे निधन झाले.
राकेश पांडे यांच्या करिअरची सुरुवात
राकेश पांडे यांचा जन्म हिमाचल प्रदेशमध्ये झाला होता. त्यांनी १९६९ मध्ये ‘सारा आकाश’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी समर ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी हिंदी आणि भोजपुरी चित्रपटात बरीच वर्षे काम केलं. १९७८ मध्ये आलेल्या ‘मेरा रक्षक’मध्ये त्यांनी मंगलची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना खूप ओळख मिळाली.
राकेश पांडे यांचे चित्रपट
राकेश पांडे यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. ‘दरवाजा, ये है जिंदगी’, ‘वो मैं नहीं’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून लोकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडली. भोजपुरी चित्रपटसृष्टीत त्यांंनी ‘बलम परदेसिया’ सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. राकेश यांच्या या भोजपुरी चित्रपटाचं खूप कौतुक झालं होतं.
राकेश पांडे यांच्या मालिका
राकेश पांडे यांनी चित्रपटांबरोबर टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. त्यांनी ‘छोटी बहू’ या लोकप्रिय शोमध्ये दादाजींची भूमिका साकारली होती आणि ‘दहलीज’ मालिकेतही त्यांनी काम केलं होतं. राकेश पांडे यांनी ‘देवदास’, ‘दिल चाहता है’, ‘लक्ष्य’ आणि ‘ब्लॅक’ मध्येही काम केलं होतं. २०१७ मध्ये कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ या सिनेमातून त्यांनी पुनरागमन केलं. त्यांनी ‘हुडदंग’ आणि ‘द लॉयर’ शो या वेब सीरिजमध्येही भूमिका केल्या होत्या.