राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री रेहाना सुलतान यांच्यावर नुकतीच हृदयाचा व्हॉल्व्ह बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्वास घेण्यास अडचण येऊ लागल्यानंतर त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या रेहाना सुलतान मुंबईत आपल्या भावाबरोबर राहतात. गेल्या काही काळापासून त्यांना गंभीर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या उपचारांना विलंब होत होता.
आयएफटीडीएचे (इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन) अध्यक्ष अशोक पंडित यांनी सांगितलं की, चित्रपट निर्माता रोहित शेट्टी, रमेश तौरानी आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी रेहाना सुलतान यांना मदत करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
हेही वाचा…वडिलांचे प्रसिद्ध अभिनेत्रीशी होते अफेअर, आईला कळालं अन् ती…; खुद्द ऋषी कपूर यांनी केलेला खुलासा
अशोक पंडित इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले, “रेहाना सुलतान गेल्या काही काळापासून माझ्या संपर्कात होत्या. त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होती, त्यांच्या हृदयातील व्हॉल्व्हमध्ये समस्या निर्माण झाली होती. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यामुळे त्यांचा भाऊ ऋषभ शर्माने मला फोन करून सांगितले की रेहाना यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणं गरजेचं आहे. तसेच, ते आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत, त्यामुळे रेहाना यांच्या उपचारांना उशीर होत आहे.”
आयएफटीडीएने त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आणि रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. हॉस्पिटलमधील डॉ. नामजोशी आणि डॉ. शर्मा यांनी पैसे आधी न घेता उपचार सुरू केले, असंही अशोक पंडित यांनी सांगितलं.
हेही वाचा…अमली पदार्थांचे सेवन, करिअरला लागलेली उतरती कळा; गायकाने सांगितला वाईट काळाचा अनुभव
“मी रोहित शेट्टी, रमेश तौरानी, जावेद अख्तर साहेब, राजेन साहनी, सुनील बोहरा, विपुल शाह आणि टेलिव्हिजन निर्माता राजन शाही यांना फोन केला आणि त्यांनी तात्काळ हॉस्पिटलच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले, ज्यामुळे त्यांचे व्हॉल्व्ह बदलण्याचे ऑपरेशन काल पूर्ण झाले. रेहाना सुलतान यांची प्रकृती आता स्थिर आहे, मात्र त्या आयसीयूमध्ये आहेत आणि अजून काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. रोहित शेट्टी शहराबाहेर होते, रमेशजी सुवर्ण मंदिरात होते, सुनील बोहरा राजस्थानमध्ये होते, परंतु सर्वांनी तात्काळ मदत केली,” असे अशोक पंडित यांनी सांगितले.
७४ वर्षीय रेहाना सुलतान या ‘दस्तक’ (१९७०) या त्यांच्या पहिल्या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखल्या जातात, या भूमिकेसाठी रेहाना यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून (एफटीआयआय) शिक्षण घेतले आहे.
रेहाना सुलतान सध्या मुंबईत आपल्या भावासोबत राहतात. आयएमपीपीए (इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन) ही संस्था या ज्येष्ठ अभिनेत्रीला मासिक भत्ता देत आहे आणि आता शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांचा खर्चही उचलत आहे.