लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. ‘छावा’मध्ये महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल साकारणार आहे. तर, सिनेमात महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना झळकणार आहे. याशिवाय ‘छावा’मध्ये औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना साकारत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी अक्षयच्या कामाचं कौतुक करताना त्याला बॉलीवूडच्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक अशी उपमा दिली आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका ज्याप्रकारे साकारलीये ती खरंच उल्लेखनीय आहे असं दिग्दर्शकांनी बॉलीवूड हंगामाशी संवाद साधताना सांगितलं. “अक्षय खूप कमी बोलतो पण, तो डोळ्यांनीच खूप काही सांगून जातो. चित्रपटात सुद्धा अक्षय खन्नाच्या अभिनयाची वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळेल” असं दिग्दर्शक म्हणाले.

“अक्षय काही विशिष्ट चित्रपटांमध्ये काम करतो. तो माणूस म्हणून खूपच चांगला आहे. जे काही करतो ते अगदी मनापासून करतो. या सिनेमात त्याने भूमिका साकारावी, यासाठी मी त्याची भेट घेण्यासाठी त्याच्या अलिबागच्या घरी गेलो होतो” असंही दिग्दर्शकांनी सांगितलं.

अक्षय खन्नाबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल विकी कौशल म्हणाला, “औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांना शोधण्यासाठी आणि त्यांना कैद करण्यासाठी जवळपास नऊ वर्षे लागली. त्यामुळे औरंगजेब महाराजांना शोधण्यासाठी किती प्रयत्न करतो या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळतील. महाराज आणि औरंगजेब एकमेकांसमोर येण्याची वाट पाहावी लागेल.”

पुढे याला जोडून लक्ष्मण उतेकर म्हणाले, “ज्या दिवशी त्यांचा एकत्र सीन शूट करायचा होता त्या दिवशी सेटवर ते एकमेकांना पहिल्यांदा भेटले. तेही एक पात्र म्हणून…” विकी यावर म्हणाला, “शूटआधी आम्ही एकमेकांशी अजिबात वैयक्तिकरित्या संवाद साधला नव्हता. जेव्हा आम्ही तो सीन शूट करत होतो, तेव्हा गूड मॉर्निंग, गूडबाय, हॅलो वगैरे एकमेकांना काहीचं बोललो नाही. तो औरंगजेब होता आणि मी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत होतो. आम्ही थेट शूटिंगला सुरुवात केली होती. आमच्यात कोणताही संवाद झालेला नव्हता.”

“एकमेकांच्या शेजारी खुर्च्यांवर बसून, चहा पिऊन आणि त्यानंतर तयार झाल्यावर शूट करुयात असं तुम्ही या सिनेमाच्यावेळी करू शकत नाहीत. नैसर्गिकरित्याच आम्ही संवाद करणं टाळलं…मला आशा आहे की, आता सिनेमा प्रदर्शित झाल्यावर आम्हाला एकमेकांशी गप्पा मारता येतील.” असं विकीने सांगितलं. दिग्दर्शकाने पुढे सांगितले की, “खरं तर दोन्ही कलाकारांनी एकमेकांशी संवाद साधण्यास नकार दिला होता. दोघेही त्यांच्या पात्रांमध्ये इतके बुडाले होते की, त्यांना एकमेकांचे चेहरेही पाहायचे नव्हते.”