विकी कौशल (Vicky Kushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ (Chhaava) चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर जबदरस्त कमाई करीत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाला प्रदर्शनाच्या इतक्या दिवसांनंतरही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलला पाहून प्रेक्षक त्याच्या अभिनयाचे गुणगान गात आहेत. पण, काहींना या चित्रपटातील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतील रश्मिका मंदाना आवडलेली नाही.

‘छावा’मधील रश्मिकाच्या भूमिकेबद्दल सई देवधरची प्रतिक्रिया

‘छावा’मध्ये रश्मिकाने (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणं हे अनेक प्रेक्षकांना खटकलं होतं. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीनंही रश्मिकाबद्दलची तिची भूमिका स्पष्ट केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे सई देवधर (Sai Deodhar). सईनं सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत ‘छावा’मधील रश्मिकाच्या भूमिकेबद्दल आपलं मत व्यक्त केलं. यावेळी रश्मिका मंदाना या दाक्षिणात्य अभिनेत्रीनं मराठी भूमिका साकारल्यामुळे तिच्यावर टीका करण्यात आली. त्या अनुषंगानं तिचा परफॉर्मन्स तुला कसा वाटला?, असं सईला विचारण्यात आलं.

“अभिनय खूप उत्तम होता; पण भाषेचा लहेजा खटकला”

त्या प्रश्नाचं उत्तर देत सई (Sai Deodhar) असं म्हणाली, “‘छावा’मध्ये रश्मिका मंदानाचा अभिनय खरंच खूप उत्तम होता; पण तिच्या भाषेचा लहेजा सर्वांना खटकला. कारण- साहजिकच आहे; सर्वांनाच हे माहीत आहे की, त्या भूमिकेचा दक्षिणेशी तसा काहीच संबंध नव्हता. त्यामुळे मला असं वाटतं की, कदाचित डबिंग झालं असतं किंवा तिनं मराठी लहेजा पकडला असता, तर तिला इतकं बोललं गेलं नसतं. पण, तिनं अभिनय खूपच छान केला आहे. त्याशिवाय ती चित्रपटात चांगली दिसलीही आहे; पण तिनं भाषा आणि उच्चारावर मेहनत घेतली असती, तर आणखी चांगलं झालं असतं हे नक्कीच”.

“कितीही चांगलं काम करा; एखादा समूह कौतुक करणारच नाही”

नंतर सिद्धार्थनं सईला (Sai Deodhar) या भूमिकेसाठी मराठी अभिनेत्रीला घ्यायला पाहिजे होतं का, असा प्रश्न विचारला. ज्याचं उत्तर देत सई असं म्हणाली, “आता प्रत्येक जण त्याचं मत मांडू लागला आहे. तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी एखादा समाज किंवा एखादा समूह, जो तुमच्या कामाचं कौतुक करणारच नाही. मग तुम्ही कितीही चांगलं काम करा. त्यामुळे मला वाटतं की, त्यामुळे काही फरक पडत नाही”.

“कलाकार जी भूमिका साकारत आहोत, त्या भूमिकेच्या भाषेचा लहेजा शिकलाच पाहिजे”.

पुढे सई (Sai Deodhar) पुढे म्हणाली, “रणवीर सिंहनं ‘बाजीराव मस्तानी’मध्ये त्याच्या भूमिकेत मराठी लहेजा बरोबर आणला होता; रश्मिकाला ते जमलं नाही. पण, म्हणून तशा भूमिका इतर भाषिक कलाकारांना द्यायच्याच नाहीत, असं मी म्हणत नाही. फक्त कलाकारानं जी भूमिका साकारत आहोत, त्या भूमिकेच्या भाषेचा लहेजा हा पकडलाच पाहिजे. रश्मिकाला मराठी भूमिका दिली हे मला अजिबातच खटकलेलं नाही”.

अभिनेत्री सई देवधरबद्दल…

दरम्यान, ‘कसौटी जिंदगी की’, ‘काव्यांजली’, ‘कहानी घर घर की’, ‘दबंगी – मुलगी आयी रे आयी’ अशा लोकप्रिय मालिकांमधून सई (Sai Deodhar) प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्याशिवाय ‘प्रहार’, ‘लपंडाव’, ‘मोगरा फुलला’ या चित्रपटांच्या माध्यमातूनही सईनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

Story img Loader