Chhaava Movie : विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. विकी कौशलसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना यात प्रमुख भूमिका साकारणार आहे.

‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरने प्रदर्शित झाल्यावर रेकॉर्डब्रेकिंग व्ह्यूज मिळवले आहे. याशिवाय संपूर्ण देशभरात हा ट्रेलर पहिल्या स्थानावर ट्रेंड करत असल्याची पोस्ट सुद्धा निर्मात्यांकडून शेअर करण्यात आली होती. यावरुन ‘छावा’ सिनेमाची क्रेझ किती मोठ्या प्रमाणात आहे याची प्रचिती मिळते.

विकी कौशलचा रुद्रावतार प्रेक्षकांना ‘छावा’च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. भारदस्त संवाद, ऐतिहासिक लढाया या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असा हा ट्रेलर आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘छावा’मध्ये प्रेक्षकांना एका मराठी अभिनेत्याची झलक सुद्धा मिळत आहे. या अभिनेत्याचं नाव आहे संतोष जुवेकर. अभिनेता संतोष जुवेकर ‘छावा’च्या निमित्ताने बॉलीवूड स्टार विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यावर संतोषने एक खास पोस्ट शेअर केली होती. “फायनली माझं शूट संपलं. पण, शूटिंगचे दिवस आठवणीत राहतील कारण, उत्तम कलाकारांची आणि टीमची साथ असेल, तर काम बहारदार रंगतं आणि मनही कामात रमतं. या क्लिपमधून तुम्हाला आम्ही सेटवर केलेल्या मस्तीची कल्पना येईल. पण, मला खात्री आहे सिनेमाचा पहिला ट्रेलर येईल तेव्हा आम्ही काम करताना काय तोडफोड मेहनत केलीये याची सुद्धा कल्पना येईल.” असं त्याने आधीच पोस्ट शेअर करत म्हटलं होतं आणि अपेक्षेप्रमाणे ‘छावा’चा ट्रेलर सर्वत्र तुफान हिट ठरला आहे.

Chhaava Movie
विकी कौशलच्या सिनेमात झळकणार मराठी अभिनेता ( Chhaava Movie )

संतोष जुवेकर आजवर मराठी मालिका, चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘वादळवाट’, ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ अशा मालिकांमध्ये त्याने काम केलेलं आहे. याशिवाय अभिनेत्याने ‘झेंडा’, ‘सनई चौघडे’, ‘मोरया’, ‘रिंगा रिंगा’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader