बॉलीवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या आगामी ‘छावा’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामात व्यग्र आहे. विविध मुलाखतींमधून तो ‘छावा’ चित्रपटासाठी घेतलेली मेहनत आणि काही किस्से सांगत आहे. अशात आता विकीनं अजय-अतुलच्या एका मराठी गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मराठी सिनेविश्वातील २००९ साली आलेला ‘जोगवा’ हा चित्रपट तुफान गाजला. त्यातील अजय-अतुलचं ‘लल्लाटी भंडार’ हे गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. आता याच गाण्याची विकी कौशललाही भुरळ पडली आहे. विकीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाची तयारी करताना आधी काय मेहनत घेतली याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये तो जिममध्ये सायकलिंग करतोय. सायकलिंग करताना त्यानं ‘लल्लाटी भंडार’ हे गाणं लावलं आहे. सायकलिंग करता करता त्यानं या गाण्यावर ठेकाही धरल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मराठी सिनेसृष्टी आणि त्यातील अनेक गाणी इतकी प्रसिद्ध आहेत की, बॉलीवूडच्या कलाकारांनाही ती गाणी भावतात. विकीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर त्याने अन्य काही व्हिडीओ आणि फोटोही शेअर केलेत. एका व्हिडीओमध्ये विकी घोडेस्वारी शिकताना दिसत आहे. तर, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये शिवकालीन लाठीकाठी युद्धकलेचा सराव करताना दिसत आहे.
विकीने टोचले कान
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटातील प्रमुख भूमिका विकी कौशलने साकारली आहे. संभाजी महाराजांची भूमिका अगदी हुबेहूब साकारता यावी यासाठी विकीनं स्वत:चे कानही टोचले आहेत. एका व्हिडीओमध्ये तो कान टोचताना दिसत आहे. कान टोचताना झालेल्या वेदनेमुळे तो कळवळत आहे. विकीनं त्याचे हे व्हिडीओ आणि फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये ‘छावा चित्रपटाच्या तयारीचे जुने आणि छान दिवस! १४ फेब्रुवारीला भेटूया’, असं लिहिलं आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला सर्वत्र चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ‘छावा’ चित्रपटात कोणत्याही व्हीएफएक्सचा वापर केलेला नाही. जोपर्यंत पूर्ण लूक, तलवारबाजी व घोडेस्वारी येणार नाही तोपर्यंत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार नाही, असं त्यांनी विकीला सांगितलं होतं. ‘रेडियो नशा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विकीनं याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला होता, “छावा ही माझ्या आयुष्यातील सर्वांत जास्त शारीरिक मेहनत घेतलेली भूमिका आहे. माझ्यासाठी ते खूप कठीण होतं. सर्व साध्य करण्यासाठी मला सात महिन्यांचा वेळ लागला. जोपर्यंत तू योग्य लूक, घोडेस्वारी व तलवारबाजी पूर्ण शिकत नाहीस, तोपर्यंत मी चित्रपट सुरू करणार नाही, असं लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट सांगितलं होतं.”