Chhaava Tax Free: छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट सध्या जगभरात चर्चेत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट शुक्रवारी १४ फेब्रुवारीला रिलीज झाला, तेव्हापासून कमाईचे रेकॉर्ड मोडत आहे. अवघ्या ३ दिवसांत या चित्रपटाने बजेटची रक्कम वसूल केली, तर ६ दिवसांत २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट आता टॅक्स फ्री करण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्रात अद्याप ‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री झाला नाही, पण दोन राज्यांनी तो टॅक्स फ्री केला आहे.

मध्य प्रदेश सरकारने राज्यात ‘छावा’ टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता गोव्यात ‘छावा’ टॅक्स फ्री (Chhaava Tax Free in Goa) करण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक्सवर एक पोस्ट करून ही घोषणा केली आहे. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणला आहे, असं सावंतांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आणि बलिदानावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट गोव्यात टॅक्स फ्री असेल, ही घोषणा करताना मला आनंद होत आहे. देव, देश आणि धर्मासाठी विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा हा चित्रपट गौरवशाली इतिहास पडद्यावर आणला आहे. हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचे बलिदान, ज्यांनी मोघल, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध लढा दिला, तो लढा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”

मध्य प्रदेशमध्येही ‘छावा’ टॅक्स फ्री!

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट मध्य प्रदेश राज्यात टॅक्स फ्री केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घोषणा केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘छावा’ हा चित्रपट करमुक्त होईल, ही घोषणा करत आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहे. त्यांनी खूप यातना सहन केल्या. आपल्या देश धर्मासाठी प्राण दिला”, असं मोहन यादव म्हणाले.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात ‘छावा’ टॅक्स फ्री करण्याबाबत काय म्हणाले?

“मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की, हा सिनेमा टॅक्स फ्री करा. पण मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा जो करमणूक कर असतो तो माफ केला जातो. महाराष्टाने २०१७ सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात करमणूक कर हा नेहमी‍करिता रद्द केला आहे. आपल्याकडे (महाराष्ट्रात) करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही,” असे फडणवीस म्हणाले.

Story img Loader