Vicky Kaushal : कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला हिंदी व मराठी कलाविश्वातील दिग्ग्जांनी उपस्थिती लावली होती. मनसेच्या या कार्यक्रमात आशुतोष गोवारीकर, आशा भोसले, जावेद अख्तर, अशोक सराफ, महेश मांजरेकर, रितेश देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमामुळे विकी कौशल व या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सर्वत्र चर्चेत आहेत. या दोघांनाही या कार्यक्रमाचं विशेष निमंत्रण होतं.
विकी कौशलने या कार्यक्रमात वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची ‘कणा’ ही कविता सादर केली. “मला दहावीत मराठीत जास्त मार्क्स मिळाले, इंग्रजीत कमी मिळाले होते. पण माझं मराठी इतकं छान नाही. त्यामुळे काही भूलचूक झाली तर मला माफ करा.” असं म्हणत विकीने ही कविता सादर केली. विकीने या कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर सर्वात आधी मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या दिग्गजांची भेट घेतली.
विकी कौशल मंचावर येत असताना त्याने लांबूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाहिलं होतं. त्यामुळे अभिनेत्याने दोन्ही हात जोडून त्यांना अभिवादन करतच मंचावर एन्ट्री घेतली. विकी आलेला पाहताच राज ठाकरेंनी त्यांना मिठी मारली. यानंतर विकीने जवळच बसलेल्या जावेद अख्तर यांना पाहिलं आणि त्यांना अभिवादन केलं. मंचावर उपस्थित आशा भोसले, अशोक सराफ या दिग्गज मंडळींच्या विकी पाया पडला. पुढे त्याने ‘लगान’ फेम लोकप्रिय दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची गळाभेट घेतली. अभिनेत्री सोनाली बेंद्रेची देखील विकीने यावेळी विचारपूस केली.
यानंतर विकीने सोनाली बेंद्रेच्या बाजूला उभ्या असलेल्या रितेश देशमुखला पाहिलं. या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. रितेश व विकी यांनी एकमेकांना मिठी मारली. रितेशने यावेळी विकीला लहान भावाप्रमाणे जवळ घेत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यानंतर विकी महेश मांजरेकरांच्या देखील पाया पडल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
मंचावर उपस्थित एकूण एक मंडळींची विकीने विचारपूस केली. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “याला म्हणतात संस्कार आणि खरा साधेपणा”, “विकीने त्याच्या साधेपणाने मन जिंकून घेतलं”, “खूप छान आहेत विकी सर”, “छावासाठी त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालाच पाहिजे त्याचे संस्कार खूप मोठे आहेत”, “विकी खरंच खूप नम्र मुलगा आहे”, “विकीने सर्वांची आदराने भेट घेतली”, “राजे खऱ्या अर्थाने मुजरा तुम्हाला” अशा प्रतिक्रिया देत युजर्सनी विकीचं भरभरून कौतुक केलं आहे.