Chhaava Movie Premiere : ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित होताच सर्वत्र छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि चित्रपटात विकीने साकारलेली महाराजांची भूमिका याची चर्चा होताना दिसत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’मध्ये विकी प्रमुख भूमिका साकारणार हे आधीपासूनच निश्चित होतं. सिनेमात विकीने शंभूराजेंच्या भूमिकेला अगदी पुरेपूर न्याय दिल्याचं सहकलाकार व दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. त्याची पत्नी कतरिना कैफने सुद्धा ‘छावा’ पाहिल्यावर नवऱ्याचं तोंडभरून कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र ‘छावा’ सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. यादरम्यान, सिनेमाच्या प्रीमियर शोमधील काही व्हिडीओ सध्या इन्स्टाग्राम रील्सवर व्हायरल होत आहेत. ‘छावा’चा क्लायमॅक्स पाहताना प्रेक्षक नि:शब्द होतात, नकळत सर्वांचे डोळे पाणावतात आणि याची प्रचिती प्रीमियर शोला सुद्धा आली.

‘छावा’चा प्रीमियर शो संपल्यावर कलाकारांमध्ये देखील भावनिक वातावरण निर्माण झालं होतं. अभिनेता संतोष जुवेकरला शो संपल्यावर अश्रू अनावर झाले होते. तर, विकी कौशलने प्रीमियर शो संपल्यावर चित्रपटगृहातच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना मिठी मारल्याचं पाहायला मिळालं. दोघेही काहीसे नि:शब्द झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी लक्ष्मण उतेकर यांची कतरिनाने सुद्धा भेट घेतली. यानंतर थिएटरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.

प्रीमियर शोसाठी विकी कौशलचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. यावेळी विकीचा लहान भाऊ अभिनेता सनीने आपल्या भावाला घट्ट मिठी मारल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय विकीचे आई-बाबा आपल्या लेकाचा दमदार अभिनय आणि चित्रपट पाहून प्रचंड भारावून गेले होते.

विकी कौशलचे वडील शाम कौशल म्हणाले, “देवाच्या कृपेने माझ्या विकीचा ‘छावा’ सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. इतका अद्भुत आणि हृदयस्पर्शी चित्रपट बनवल्याबद्दल संपूर्ण टीमला माझा सलाम आहे. जोर दी झप्पी विकी पुत्तर… एक वडील म्हणून मी खूप धन्य झालो, विकीचा खूप अभिमान वाटतोय..”

दरम्यान, प्रीमियर शोमधल्या या भावनिक व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘छावा’ने पहिल्याच दिवशी ३३.१ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.

Story img Loader