Chhaava Movie : सध्या सिनेप्रेमींमध्ये १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘छावा’ चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. सिनेमाची संपूर्ण टीम या प्रोजेक्टवर जवळपास ३-४ वर्षे मेहनत घेत असल्याचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं होतं. याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी विकी कौशलने सुद्धा ७ ते ८ महिने प्रशिक्षण घेतलं होतं. यानंतरच ‘छावा’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचं अभिनेत्याने नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ‘छावा’ चित्रपटाचं कास्टिंग, त्यानंतर घेतलेली मेहनत, छत्रपती संभाजी महाराजांवर केलेला अभ्यास याबद्दल विकी नेमकं काय म्हणालाय जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकी कौशल म्हणाला, “मी आणि सर ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाचं शूटिंग करत होतो. तेव्हाच मला सरांनी सांगितलं होतं, आपण पुढचा चित्रपट ‘छावा’ करुयात. मला महाराजांबद्दल माहिती होतं पण, या चित्रपटाच्या निमित्ताने अगदी लहान-लहान गोष्टींचा मला अभ्यास करता आला. मी या निमित्ताने खूप गोष्टी वाचल्या. मला सरांनी महाराजांबद्दल पहिलं वाक्य सांगितलं होतं ते म्हणजे, राजेंची तलवार ६० किलोंची होती. ती ६० किलोची तलवार फक्त उचलायची नाहीये… त्याने लढाई करायची आहे. हे सगळं ऐकून मी थक्क झालो होतो. त्यावेळी मला वजन वाढवावं लागेल याची कल्पना आली.”

वजन वाढवलं अन् ‘या’ दोन गोष्टींचं प्रशिक्षण घेतलं – विकी कौशल

“सुरुवातीला मी २५ किलो वजन वाढवलं. माझं वजन तेव्हा ८० किलो होतं, ते मी जवळपास १०५-१०६ किलोपर्यंत वाढवलं. त्यानंतर आम्ही शूटिंगला सुरुवात केली. दोन गोष्टी मला सरांनी अगदी स्पष्टपणे सांगितल्या होत्या. त्या म्हणजे, तुला घोडेस्वारी आलीच पाहिजे… त्यात कोणतीच सूट नसेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तलवारबाजी. त्यात तुम्ही एकदम पारंगत असलं पाहिजे. तलवारबाजी करताना जणू तो तुझा तिसरा हात आहे असं लोकांना वाटलं पाहिजे. या सगळ्या तयारीसाठी ७ ते ८ महिने गेले. त्यानंतर सरांना सगळ्या गोष्टी योग्य वाटल्या…मगच आम्ही शूटिंगला सुरुवात केली.”

अभिनेता पुढे म्हणाला, “आमचं शूटिंग जवळपास ६ ते ७ महिने सुरू होतं. ऑक्टोबर ते एप्रिल या काळात आमचं शूटिंग झालं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या व्यक्तिरेखा जशाच्या तशा साकारणं हे कोणालाच शक्य नाही, कारण राजे महान होते… आज आपण त्यांची भूमिका साकारताना फक्त आपले १०० टक्के देऊ शकतो. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले. पण, या प्रवासात महाराजांबद्दल मी जे काही शिकलो, ते आता मला आयुष्यभर लक्षात राहणार आहे.”

“शंभूराजे आग्र्याला गेले, तेव्हा ते फक्त ९ वर्षांचे होते. त्यांना १३ भाषा अवगत होत्या. लहान वयातच राजेंनी ग्रंथ, कवितांची रचना केली आहे. त्यांचं व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. कुटुंबाकडेही त्यांचं लक्ष असायचं. महाराजांचा इतिहास पाहायला गेलं तर, आज मी ३७ वर्षांचा आहे आणि मी रेतीच्या एका कणाएवढं जीवनही जगलो नाहीये. महाराज सर्वांसाठीच प्रेरणास्थान आहेत.” असं विकी कौशलने यावेळी सांगितलं.