अभिनेता विकी कौशल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘छावा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले. आता मात्र अभिनेता त्याच्या व्यावसायिक नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

तीन वर्षांत ‘इतके’ कोटी रुपये द्यावे लागणार

विकी कौशल व त्याची पत्नी कतरिना कैफ सध्या ज्या घरात ते भाड्याने राहत आहेत, त्याचा करार वाढवला आहे. मुंबईमधील जुहू येथे त्यांचे अपार्टमेंट आहे. स्क्वेअर यार्डकडे असलेल्या कागदपत्रांनुसार तीन वर्षांसाठी हा करार वाढवण्यात आला आहे. हा व्यवहार २०२५ मध्ये झाला आहे.

विकीचा भाडेतत्त्वावरील अपार्टमेंट राज महाल येथे आहे. या अपार्टमेंटचे २,७८१.८३ चौरस फूट इतके क्षेत्रफळ आहे. या व्यवहारासाठी त्याला १.६९ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली. याबरोबरच या करारात तीन कार पार्किंग आणि १.७५ कोटी रुपयांचे डिपॉझिट आहे.

या करारानुसार पहिल्या दोन वर्षात विकी कौशलला प्रत्येक महिन्याला १७.०१ लाख रुपये भाडे द्यावे लागेल. त्यानंतर तिसऱ्या वर्षी १७.८६ लाख इतके प्रति महिना भाडे द्यावे लागेल. याआधी २०२१ मध्ये करार केला होता, तेव्हा हे भाडे ८ लाख प्रतिमहिना असे सुरू झाले होते. आता विकी कौशलला ३ वर्षांत ६.२ कोटी भाडे भरावे लागणार आहे.

सी फेस असणारी आलिशान घरे, उच्चभ्रू परिसर, रेस्टॉरंट, तसेच जवळच असलेल्या अंधेरी, वांद्रे येथे असलेली व्यावसायिक केंद्रे, यामुळे जुहू हे मुंबईतील महत्त्वाचे ठिकाण आहे. विकी कौशल व कतरिना कैफसह कार्तिक आर्यन, श्रद्धा कपूर, वरूण धवन, शक्ती कपूर, जान्हवी कपूर यांचेदेखील जुहूमध्ये अपार्टमेंट आहे.

दरम्यान, विकी कौशल नुकताच लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटात दिसला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून विकी कौशलने प्रेक्षकांचे मन जिंकले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात रश्मिका मंदाना व अक्षय खन्नादेखील प्रमुख भूमिकेत दिसले. आता तो लवकरच ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याबरोबर रणबीर कपूर व आलिया भट्टदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.