विकी कौशल (Vicky Kaushal) हा त्याच्या ‘छावा’ चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमाने धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला असल्याचे बॉक्स ऑफिसवरील कमाईवरून पाहायला मिळत आहे. याबरोबरच छावा चित्रपटात काम केलेले कलाकारही मोठ्या चर्चेत आहेत. आता अभिनेता विकी कौशलने एका मुलाखतीत त्याला महाराष्ट्रातील कोणता पदार्थ आवडतो, यावर वक्तव्य केले आहे.

अभिनेता विकी कौशल काय म्हणाला?

एका मुलाखतीत विकी कौशलला महाराष्ट्रातील एक कोणता पदार्थ आहे जो खूप आवडतो, असे विचारण्यात आले. यावर उत्तर देताना अभिनेत्याने म्हटले, “एक नाही खूप आहेत. मला मालवणी जेवण खूप आवडतं. पण, माझा आवडता नाश्ता मिसळ पाव आहे. मला मिसळ पाव खूप आवडतो. कोणतंही डाएट असू दे, थोडा मिसळ पाव मी खातोच”, असे म्हणत विकी कौशलने महाराष्ट्रातील आवडता पदार्थ सांगितला आहे. याआधीही अभिनेत्याने मालवणी जेवण आवडत असल्याचे म्हटले होते.

विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकल्याचे पाहायला मिळत आहे. छावा चित्रपटात अभिनेत्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याने साकारलेली भूमिका पाहून प्रेक्षक भावूक झाल्याचे दिसत आहे. याबरोबरच, लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली असून अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक बॉलीवू़ड तसेच मराठी कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. याबरोबरच, विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनीही विकी कौशलसह इतर कलाकारांच्या कामाचे कौतुक केले आहे.

१४ फेब्रुवारी २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने मोठी कमाई केल्याचे दिसत आहे. ९ दिवसात या चित्रपटाने २९३.४१ कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिवशी अभिनेता विकी कौशल चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासह रायगडावर अभिवादन करण्यासाठी गेला होता. माध्यमांशी बोलताना अभिनेत्याने कृतज्ञता व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

Story img Loader