विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विकी-सारा ही नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, खऱ्या आयुष्यात विकी कौशलने २०२१ मध्ये बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफबरोबर लग्नगाठ बांधली परंतु, विकी-कतरिनाची पहिली भेट केव्हा झाली याबाबत फार कमी जणांना माहिती आहे.
हेही वाचा : “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…,” पत्नी कियाराचा उल्लेख करीत सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केला ‘तो’ फोटो
विकी आणि कतरिना पहिल्यांदा एका अवॉर्ड शोमध्ये भेटले होते असे अनेकदा दोघांनीही सांगितले आहे. पुरस्कार सोहळ्यात विकी सूत्रसंचालन करीत होता तेव्हा त्याने “कतरिना मी तुझा खूप मोठा चाहता आहे… सध्या सगळे जण लग्न करीत आहेत तू सुद्धा एखाद्या चांगल्या विकी कौशलचा शोध घेऊन लग्न का करत नाहीस?” असा प्रश्न करीत अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली होती. दोघांचे लग्न झाल्यावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. अनेकांनी या व्हिडीओवर “विकीचे बोलणे कतरिनाने खरे करून दाखवले” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.
विकीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर विकी कौशलने एका मुलाखती दरम्यान याबाबत खुलासा केला होता. विकी म्हणाला, व्हायरल व्हिडीओमधील सर्व डायलॉग स्क्रिप्टेड होते. मला फक्त एवढेच माहीत होते की, कोणतीही अभिनेत्री रंगमंचावर आली तरीही मला हाच डायलॉग बोलायचा होता. नेमकी त्यावेळी कतरिना आली आणि मी तिला स्क्रिप्टप्रमाणे लग्नाची मागणी घातली. पुढे करण जोहरने ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये कतरिनाला मोठ्या पडद्यावर तुला कोणत्या अभिनेत्याबरोबर काम करायला आवडेल? असा प्रश्न विचारला होता. यावर तिने ‘मला वाटते विकी कौशल आणि मी एकत्र स्क्रिनवर चांगले दिसू कारण तो उंच आहे’. यानंतर कालांतराने विकी-कतरिनाच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली.
विकी कौशल सध्या सारा अली खानबरोबर त्याचा आगामी चित्रपट ‘जरा हटके जरा बचके’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.