Chhaava Movie : विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची सध्या संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने तीन दिवसांतच १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. अनेक ठिकाणी ‘छावा’साठी विशेष शो आयोजित केले जात आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहण्यास लोक पसंती देत आहे. याशिवाय विकीच्या अभिनयाचं सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येतंय. त्याची पत्नी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने सुद्धा ‘छावा’च्या प्रीमियरनंतर नवऱ्यासाठी भावुक पोस्ट लिहित त्याचं कौतुक केलं होतं.
आता नुकत्याच ‘एबीपी लाइव्ह’ला दिलेल्या मुलाखतीत विकीने चित्रपटाचा ट्रेलर आल्यावर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती? याबाबत खुलासा केला आहे. विकीला सिनेमाचे निर्माते दिनेश विजन यांनी एक दिवस आधीच ट्रेलर फोनवर पाठवला होता. तो म्हणाला, “मी प्रचंड घाबरलो होतो… कारण, आपलं काम कसं झालंय याची मला कल्पना नव्हती. ट्रेलर जसा माझ्या फोनवर आला, तसा मी माझ्या घरच्या मंदिरात माझा फोन ठेवला आणि ट्रेलर पाहिला. देवाला म्हणालो आता तूच सांभाळून घे…खूप मेहनत घेतलीये, आता तुझ्या हातात सगळं काही आहे. मी ट्रेलर पाहिल्यावर लगेच माझ्या आईला दाखवला. ट्रेलर पाहताचक्षणी आई-बाबा, कतरिना, सनी सर्वांनाच खूप आवडला.”
विकीच्या आईने विचारला ‘हा’ प्रश्न
ट्रेलर पाहून आईची प्रतिक्रिया काय होती याबद्दल विकीने ‘आईएमडीबी’च्या मुलाखतीत सांगितलं आहे. अभिनेत्याची आई प्रचंड भावुक झाली होती. तिने विकीला जवळ घेतलं, त्याला मिठी मारली आणि लाडक्या लेकाला एकच प्रश्न विचारला होता तो म्हणजे…हा खरंच तू आहेस का? विकी सांगतो, “मला माझ्या आईची ती प्रतिक्रिया खूपच गोड वाटली. ती प्रचंड भावुक झाली होती.”
याशिवाय लेकाचा सिनेमा पाहून शाम कौशल म्हणाले, “देवाच्या कृपेने माझ्या विकीचा ‘छावा’ सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. इतका अद्भुत आणि हृदयस्पर्शी चित्रपट बनवल्याबद्दल संपूर्ण टीमला माझा सलाम आहे. जोर की झप्पी विकी पुत्तर… एक वडील म्हणून मी खूप धन्य झालो, विकीचा खूप अभिमान वाटतोय..”
दरम्यान, सध्या सर्व स्तरांतून ‘छावा’ सिनेमावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. यामध्ये विकी कौशलसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत सिंह, डायना पेंटी, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.