अभिनेत्री सारा अली खान ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यामध्ये तिच्याबरोबर विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. दोघेही प्रमोशनच्या निमित्ताने विविध शहरांना भेटी देत आहेत, चाहत्यांशी संवाद साधत आहे. चित्रपटासाठी साराने उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शन घेतले व पूजा केली. पण यानंतर तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलर्सना तिने सडेतोड उत्तर दिलं होतं, त्यानंतर आता विकी कौशलनेही ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – महाकाल मंदिरात दर्शन घेतल्याने नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; सारा अली खान सडेतोड उत्तर देत म्हणाली, “या माझ्या…”
साराचे वडील सैफ अली खान मुस्लीम आहे व तिची आई अमृता सिंह हिंदू आहे. त्यामुळे सारा मंदिरात गेल्यावर तिला कायम ट्रोल केलं जातं. यावेळी सारा अली खान ट्रोल झाल्यानंतर विकी कौशल म्हणाला, “खरं तर याबद्दल ट्रोलर्सना तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजेत. मीडिया जेव्हा अशा गोष्टी कव्हर करते, म्हणून ट्रोलर्सची हिंमत वाढते. सारा अली खानला हवा तो धर्म मानण्याचा पूर्ण अधिकार आहे.” यासंदर्भात एबीपीने वृत्त दिलंय.
दरम्यान, ट्रोलिंगनंतर सारानेही स्पष्ट शब्दांमध्ये ट्रोल करणाऱ्यांची कानउघडणी केली होती. “मी हे आधीही सांगितले आहे आणि पुन्हा पुन्हा सांगत आहे की मी माझं काम खूप गांभीर्याने घेते. मी लोकांसाठी काम करते, त्यामुळे त्यांना काही आवडत नसेल तर मला वाईट वाटेल. पण, या माझ्या वैयक्तिक श्रद्धा आहेत. ज्या श्रद्धेने मी बंगला साहिब किंवा महाकालला जाईन त्याच श्रद्धनेने मी अजमेर शरीफला जाईन. लोकांनी हवं ते बोलावं, मला काहीच त्रास नाही. माझ्यासाठी, एखाद्या ठिकाणची ऊर्जा महत्त्वाची असते. मी ऊर्जेवर विश्वास ठेवते”, असं साराने म्हटलं होतं.
दरम्यान, ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात सारा अली खानबरोबर अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट आज २ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.