अभिनेता विकी कौशलने ‘मसान’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटासाठी त्याचे भरभरून कौतुक करण्यात आले. ‘मसान’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन २४ जुलैला ८ वर्ष पूर्ण झाली. याच निमित्ताने विकीने ‘फिल्म कम्पॅनियन’च्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीचा संघर्ष आणि घरातून दिलेले संस्कार याबाबत खुलासा केला आहे.
विकी कौशल म्हणाला, “चित्रपटसृष्टीत मी यशस्वी झाल्यानंतर माझ्या घरी काहीच बदल झाला नाही. आई-वडिलांच्या वागण्यात मला कधीही वेगळेपणा जाणवला नाही. ते माझ्याशी पूर्वीप्रमाणेच वागतात. मी सामान्य कुटुंबामध्ये लहानाचा मोठा झालो आहे, आजही आमच्या घरचे सर्व नियम मी आणि माझा भाऊ पाळतो.”
विकी कौशल पुढे म्हणाला, “२०१२ मध्ये मी दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याबरोबर सहायक दिग्दर्शक म्हणून काम करायचो. तेव्हा त्यांचा ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यावेळी आमच्या घरी एक सेकंड हॅंड गाडी होती. पण, ती गाडी मला एकट्याला वापरायची परवानगी नव्हती, कारण ती माझ्या पालकांची गाडी होती. ‘तू स्वत: मेहनत कर आणि गाडी घे’ ही माझ्या आई-वडिलांची शिकवण होती. त्यामुळे घरी गाडी असून बसने किंवा केव्हातरी रिक्षाने, मी अनुराग सरांच्या ऑफिसला आणि चित्रपटांच्या ऑडिशनला जायचो.”
हेही वाचा : प्रदर्शनाच्या आधीच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची बक्कळ कमाई, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
अभिनेता म्हणाला, “माझ्या आई-वडिलांनी मला गरजेच्या आणि चैनीच्या वस्तू यातील फरक शिकवला होता. माझ्यासारखेच सगळे नियम सनीला (भाऊ) सुद्धा लागू होते. गाडीचा वापर आम्ही नेहमी आईला योगाला सोडण्यासाठी किंवा सगळेजण बाहेर जाताना करायचो. शेवटपर्यंत आई-वडिलांनी एकट्याला कुठेही गाडी घेऊन जाण्यास परवानगी दिली नव्हती.”