कतरिना कैफ व विकी कौशल हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहे. डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता त्यांच्या लग्नाला दीड वर्ष पूर्ण झालं. दरम्यान, विकीने सुखी वैवाहिक जीवनासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
हेही वाचा- “मी डेटॉलने गुळण्या केल्या…” नीना गुप्ता यांनी सांगितली पहिल्या किसिंग सीनची आठवण
विकी म्हणाला, “माझ्या कुटुंबातील जवळपास सर्वजण फिल्म इंडस्ट्रीतील आहेत. माझे वडील शाम कौशल, भाऊ सनी ते माझी पत्नी कतरिना. आम्ही अनेकदा आमच्या प्रकल्पांवर एकमेकांशी चर्चा करतो आणि आमची मते मांडतो. एकदा आम्ही जेवणाच्या टेबलावर कामाच्या प्रकल्पांवर इतका वेळ चर्चा करत होतो की माझ्या आईने एक नियम बनवला की कुटुंबात रात्रीच्या जेवणाच्या वेळी आम्ही कधीही कामाबद्दल बोलणार नाही.”
मुलाखतीदरम्यान विकीला सुखी वैवाहिक जीवनासाठी टिप्स विचारण्यात आल्या. यादरम्यान त्याने अनेक रंजक गोष्टी शेअर केल्या. विकी म्हणाला. “कोणतेही लग्न सुरळीत पार पडण्यासाठी दोघांकडून संयम आवश्यक असतो. प्रत्येक गोष्टीवर दोन व्यक्तींचे एकमत होणे नेहमीच सोपे नसते. येथेच समज आणि परिपक्वता येते. गेल्या दीड वर्षात माझ्या लग्नानंतर मला हे समजले आहे की, नात्यात सुंदर पद्धतीने पुढे जाण्यासाठी संयम आवश्यक आहे. मी नेहमी चांगला पती बनण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या पत्नीवर प्रेम करतो. मी माझ्या कुटुंबावर प्रेम करतो. पण इतर व्यक्तींप्रमाणेच मीही दोषांनी भरलेला आहे.” असंही विकी म्हणाला.
कतरिना आणि विकीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर विकीचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. तर कतरिना कैफ लवकरच ‘टायगर ३’मध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. तसेच ती ‘फोन भूत’, ‘मेरी क्रिसमस’ मध्येही झळकणार आहे.