अभिनेता विकी कौशलच्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये विकी कौशलसह ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर मुख्य भूमिका साकारणार आहे. अलीकडेच दोघांनी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी विकीने त्याच्या खऱ्या लग्नासंदर्भात अनेक खुलासे केले.
हेही वाचा : “…तर तुम्ही भिकेला लागाल”; ‘श्वास’ फेम अभिनेते अरुण नलावडे यांना असं कोण म्हणालं होतं?
“तुमच्या लग्नात जेवणाचा मेन्यू कोणी ठरवला?” असा प्रश्न विकी कौशलला एका स्पर्धकाने विचारला, याविषयी सांगताना अभिनेता म्हणाला, “आमच्या लग्नात संपूर्ण नाश्ता मी ठरवला होता. सकाळी आमच्या घरातील सगळ्या लोकांना छोले भटुरे, आलू पराठे असे पदार्थ नाश्त्यासाठी हवे होते. परंतु, रात्रीच्या जेवणाचा सगळा मेन्यू कतरिनाने ठरवला होता कारण, पंजाबी लोकांना रात्री ८ नंतर ते काय खातात याचा फारसा फरक पडत नाही.” अभिनेत्याने केलेला खुलासा ऐकून बिग बी अमिताभ बच्चन यांना हसायला आलं.
हेही वाचा : “अंगाला हळद लागली आणि…”; अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने शेअर केला खऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
विकी कौशलप्रमाणे यापूर्वी दीपिका पदुकोणने रणवीर आणि तिच्या लग्नातील जेवणाबाबत खुलासा केला होता. अभिनेत्रीने तब्बल १२ वेळा पदार्थांची चव घेतल्यावर मेन्यू ठरवला होता.
हेही वाचा : ‘तीन अडकून सीताराम’चा नेमका अर्थ काय? अभिनेते दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांचा खुलासा
दरम्यान, विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यावर डिसेंबर २०२१ मध्ये बांधली. दोघांनी अद्याप एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. विकी कौशल लवकरच ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ आणि बहुचर्चित ‘सॅम बहादूर’ या दोन चित्रपटांच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तर, कतरिना कैफ सलमान खान आणि इमरान हाश्मी यांच्याबरोबर ‘टायगर ३’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.