अभिनेता विकी कौशल गेले काही महिने त्याच्या आगामी ‘सॅम बहादुर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहतेही विकीच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबद्दलचे अपडेट्स विकी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतो. यापूर्वी त्याने या चित्रपटातील त्याचा लूक पोस्ट केला होता आणि त्यानंतर या चित्रपटाच्या तयारीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावरून चाहत्यांना दाखवला होता. तेव्हापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.
विकीने आज या चित्रपटाचा एक टीझर पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. या टीचर मध्ये विकी सॅम माणेकशॉ यांच्या वेशभूषेमध्ये सैनिकांच्या रांगेतून चालत जाताना दिसत आहे. या टीझरच्या शेवटी “१ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात…” असं लिहिलेलं दिसत आहे.
हा टीझर पोस्ट करताना विकीने लिहिलं, ३६५ दिवस बाकी आहेत. “‘सॅम बहादुर’ हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.” गेले अनेक महिने तो या चित्रपटावर काम करत आहे. काही मिनिटांतच हा टीझर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. विकीचे चाहते या पोस्टवर कमेंट करत या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत.
हेही वाचा : “एवढी सोन्यासारखी बायको असताना…” विकी कौशल आणि कियारा आडवाणीचा बाथटबमधील रोमान्स पाहून नेटकऱ्यांचा संताप
सॅम माणेकशॉ यांच्या चरित्रपटामध्ये विकी कौशलसह सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख दिसणार आहेत. सान्या सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीची, तर फातिमा पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत.