Vicky Kaushal : विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ सिनेमाची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. हा सिनेमा १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला अन् प्रदर्शित होताच ‘ओपनिंग डे’लाच सिनेमाने जबरदस्त कमाई केल्याचं पाहायला मिळालं. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी जवळपास ४ वर्षे मेहनत घेऊन हा सिनेमा बनवला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. ‘छावा’ला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘छावा’ चित्रपटाने गेल्या आठड्याभरात बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. विकी कौशलच्या सिनेमाने भारतात २२५.२८ कोटी कमावले आहेत. तर, जगभरात ‘छावा’ने ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मुंबई-पुण्यात सगळे शो हाऊसफुल सुरू आहेत. सगळ्या इच्छुक प्रेक्षकांना ‘छावा’ पाहता यावा यासाठी पहाटे ६ आणि रात्री १२ नंतर देखील विशेष शोचं आयोजन करण्यात येत आहे. मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातील सेलिब्रिटी ‘छावा’च्या संपूर्ण टीमवर विशेषत: विकी कौशलवर कौतुकाचा वर्षाव करत आहे.
विकी कौशलसाठी सेलिब्रिटींनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. ‘छावा’मध्ये विकीचा अभिनय पाहून प्रेक्षक यावर्षीचे सगळे पुरस्कार विकीला डिझर्व्ह करतो असं देखील कमेंटमध्ये म्हणत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून गेल्या ७ दिवसांत सर्वत्र विकीचं कौतुक सुरू आहे. सगळीकडे सुरू असलेला कौतुकसोहळा पाहून विकीच्या कुटुंबीयांनी त्याची नजर काढली आहे. याचा गोड व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विकी कौशल लिहितो, “आशा ताईंनी मला उंचीने आणि आयुष्यात मोठं होताना पाहिलेलं आहे. कालच त्यांनी ‘छावा’ सिनेमा पाहिला. चित्रपट पाहिल्यावर त्या म्हणाल्या, उभे राहा, नजर काढायची आहे तुमची… ही त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. त्या नेहमीच माझी काळजी करत असतात. माझ्या आयुष्यात त्या आहेत याचा मला खरंच खूप आनंद आहे.”
विकीच्या व्हिडीओवर ‘छावा’मध्ये कान्होजीची भूमिका साकारणाऱ्या सुव्रत जोशीने “इडा पीडा टळो हे किती गोड आहे” अशी कमेंट केली आहे. याशिवाय अभिनेत्याच्या चाहत्यांनी सुद्धा या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “विकीला खरंच कोणाची नजर लागू नये”, “नो नजर प्लीज”, “जस्ट pure लव्ह”, “या काकूंनी अगदी बरोबर केलंय”, “टचवूड”, “सिनेमा ब्लॉकबस्टर झालाय…हे गरजेचं होतं” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.