११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. आज शंभूराजांच्या हौतात्म्याला ३३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने ‘छावा’ फेम अभिनेता विकी कौशलने पोस्ट शेअर करत महाराजांना आदरांजली वाहिली आहे.
अभिनेता विकी कौशलला ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांवर सखोल अभ्यास करता आला, असं त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. याशिवाय महाराजांच्या भूमिकेसाठी त्याने जवळपास ७ ते ८ महिने मेहनत घेतली होती. तसेच, छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट करायचा असल्याने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांसह ‘छावा’ची संपूर्ण टीम या स्क्रिप्टवर जवळपास चार वर्षे काम करत होती.
विकीने योग्य प्रशिक्षण व अभ्यास करून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. १४ फेब्रुवारीला महाराजांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि चित्रपटाने प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. ही भूमिका कायम माझ्याजवळ राहणार असं म्हणत विकीने बलिदाननिमित्त महाराजांना आदरांजली वाहिली आहे.
विकी कौशल पोस्ट शेअर करत लिहितो, “आज, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त, मी त्या योद्ध्याला वंदन करतो ज्यांनी शरणागती पत्करण्यापेक्षा मृत्यूची निवड केली, ते अकल्पनीय छळाला तोंड देत उभे राहिले… त्यांनी शेवटपर्यंत धैर्याने लढा दिला.”
“आपण साकारलेल्या काही भूमिका या कायम आपल्याबरोबर राहतात आणि मी ‘छावा’मध्ये साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही त्यापैकी एक आहे. त्यांचा जीवनप्रवास हा केवळ इतिहास नाहीये – ती गोष्ट धैर्य आणि त्यागाची आहे… जी अजूनही लाखो लोकांना प्रेरणा देते. जिंदा रहे! जय भवानी, जय शिवाजी! जय शंभूराजे!” असं म्हणत विकीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, ‘छावा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं आहे. २०२५ मध्ये ५०० कोटी कमावणारा ‘छावा’ हा पहिला सिनेमा ठरला आहे. यामध्ये विकीसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत सिंह, डायना पेंटी, दिव्या दत्ता, प्रदीप रावत, संतोष जुवेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.