Chhaava Movie Actor Vicky Kaushal : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमाचा क्लायमॅक्स पाहून प्रत्येकजण भावुक होत आहे. अगदी कतरिना कैफने सुद्धा पोस्ट शेअर करत ‘छावा’चा शेवट पाहताना नि:शब्द झाले असं म्हटलं होतं. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ‘छावा’चे शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. चित्रपट संपल्यावर शिवप्रेमींकडून थिएटरमध्येच शिवगर्जना करण्यात येत आहे. याचे असंख्य व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सध्या ‘छावा’ चित्रपट पाहिलेल्या एका चिमुकल्या मुलाचा व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे. सिनेमाचा क्लायमॅक्स पाहिल्यावर या चिमुकल्याला अश्रू अनावर झाल्याचं यात पाहायला मिळत आहे. भावुक होत या लहान मुलाने थिएटरमध्येच शिवगर्जना केली, याचा व्हिडीओ विकी कौशलने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या चिमुकल्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून शेजारी बसलेली व्यक्ती त्याला शेवटी धीर देत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
या चिमुकल्या मुलाचा व्हिडीओ पाहून विकी कौशल सुद्धा भारावून गेला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेता लिहितो, “हीच आमची सर्वात मोठी कमाई आहे. बेटा आम्हाला सर्वांना तुझा खूप जास्त अभिमान आहे. हा व्हिडीओ पाहून तुला जवळ घेण्याची, मिठी मारण्याची खूप इच्छा होतेय. ‘छावा’ चित्रपटाला तुम्ही प्रेक्षक ज्याप्रकारे प्रतिसाद देताय… हे पाहून खूपच समाधान वाटतंय. आपल्या शंभूराजेंची शौर्यगाथा प्रत्येक घराघरात पोहोचावी अशी आमची इच्छा होती आणि आज ते साध्य होतंय… हाच आमचा सर्वात मोठा विजय आहे.”
विकीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या संपूर्ण देशभरात या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. ‘छावा’ने अवघ्या तीन दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. सिनेमाने एकूण १२१ कोटींचा गल्ला जमावला आहे. यामध्ये विकी कौशलसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत सिंह, संतोष जुवेकर, डायना पेंटी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.