बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने ‘हाऊ इज द जोश’ म्हणत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या विकी त्याच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. विकी-साराची नवी ऑनस्क्रीन जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच निमित्ताने विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर प्रश्नोत्तरांचे सेशन घेत आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.
सोशल मीडियावर संवाद साधताना विकीच्या चाहत्यांनी त्याला आवडता पदार्थ, आवडता गायक कोण, असे अनेक प्रश्न विचारले. आवडता पदार्थ कोणता या प्रश्नाला उत्तर देताना विकीने दाक्षिणात्य पदार्थांचा फोटो शेअर केला, तसेच आवडता गायक अरिजित सिंह असल्याचे सांगितले. यामध्ये विकीने दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
विकी-साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटातील “तू है तो मुझे फिर और क्या चाहिए…” हे गाणे सध्या प्रचंड व्हायरल झाले आहे. यावरून विकीच्या एका चाहत्याने गाण्याच्या या ओळींनुसार तुझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्ती कोण आहेत,” असा प्रश्न त्याला विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना विकीने त्याची पत्नी कतरिना कैफसह त्याच्या आईचा गोड फोटो शेअर केला, यामध्ये कतरिना आणि विकीची आई एकमेकांना मिठी मारत आहेत. विकी कौशलच्या या उत्तराने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
दरम्यान, ‘जरा हटके जरा बचके’नंतर विकी कौशल ‘लैला मजनू’ आणि बुलबुल फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीबरोबर झळकणार असून हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेता ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ तसेच बहुचर्चित बायोपिक ‘सॅम बहादूर’ चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.