बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच लग्नबंधनात अडकली. सोनाक्षीने तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्याशी रविवारी (२३ जून रोजी) नोंदणी पद्धतीने लग्न केलं. सोनाक्षी ही दिग्गज बॉलीवूड अभिनेते व लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा व पूनम सिन्हा यांची एकुलती एक लाडकी लेक आहे. सोनाक्षीच्या आई-वडिलांबाबत सर्वांनाच माहित आहे, पण झहीरच्या आई-वडिलांबाबत फार लोकांना माहित नाही.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनमध्ये त्याच्या आई- वडिलांची झलक पाहायला मिळाली. रिसेप्शनमध्ये इक्बाल रतनसी व्हाइट तर त्यांची पत्नी ऑफ व्हाइट रंगाच्या ड्रेसमध्ये पोहोचले होते. दोघेही खूप सुंदर दिसत होते. झहीरची आई खूपच सुंदर दिसते. झहीरची आई गृहिणी आहे. त्याची बहीण सनम स्टायलिस्ट आहे, तर झहीरला एक लहान भाऊ आहे, तो कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून काम करतो.

सोनाक्षी सिन्हाने लग्नात नेसली आईची साडी, तर रिसेप्शनच्या लाल बनारसी साडीची किंमत फक्त…

अभिनेता झहीर इक्बाल हा बिझनेसमन इक्बाल रतनसी यांचा मुलगा आहे. इक्बाल रतनसी यांचा दागिन्यांचा मोठा व्यवसाय असून त्यांचे इतरही अनेक व्यवसाय आहेत. तसेच त्यांनी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. झहीर इक्बालच्या वडिलांचा रिअल इस्टेट क्षेत्रातही त्यांचा दबदबा आहे. आज तकच्या वृत्तानुसार, २००५ मध्ये त्यांनी स्टेमॅक डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली आणि २०११ पर्यंत ते या कंपनीचे संचालक राहिले. यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी ब्लॅक स्टोन हाउसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात केली.

नवविवाहित सोनाक्षी सिन्हा व तिचा पती झहीर इक्बाल यांचे शिक्षण किती? जाणून घ्या

इक्बाल रतनसी यांचं बॉलीवूड कनेक्शनही आहे. त्यांची फिल्म टूल्स कंपनी लाइट्स आणि ग्रिप ही बॉलीवूडला लायटिंग उपकरणं पुरवते. २०१६ मध्ये त्यांनी ही कंपनी चालू केली. त्यांची एक एंटरटेनमेंट कंपनीही आहे, ती करोना काळात सुरू करण्यात आली होती. झाहिरो मीडिया अँड इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. यातून ते मोठी कमाई करतात. इक्बाल रतनसी हे सलमान खानचे जवळचे मित्र आहेत. ८० च्या दशकात इक्बाल यांनी सलमान खानला आर्थिक मदतही केली होती, भाईजाननेच याबद्दल सांगितलं होतं.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांची संपत्ती किती? दोघांपैकी श्रीमंत कोण? जाणून घ्या

दरम्यान, सोनाक्षी सिन्हा व झहीर यांचं लग्न सोनाक्षीच्या घरीच नोंदणी पद्धतीने झालं. त्यानंतर दोघांनी रिसेप्शन पार्टी दिली. त्यांचं रिसेप्शन मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये पार पडलं. या रिसेप्शनला रेखा, सलमान खान, अनिल कपूर, चंकी पांडे, विद्या बालन, सायरा बानू यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.