ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका सुधा मूर्ती या सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. त्यांनी नुकतीच जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. येथील त्यांचे काही फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गीतकार, लेखक जावेद अख्तरदेखील उपस्थित होते. यावेळी सुधा मूर्ती यांनी जावेद अख्तर यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.
सुधा मूर्ती या बिझनेस टायकून, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. नामांकित लेखिका, बिझनेस वूमन व सामाजिक कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या सुधा मूर्ती यांनी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये केलेल्या कृतीने लक्ष वेधून घेतले आहे. १६०० कोटी रुपयांच्या कंपनीच्या अध्यक्षा असलेल्या सुधा मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेदेखील या लिटरेचर फेस्टिव्हलला उपस्थित होते.
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आयोजित जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये जावेद अख्तर यांना मंचावर बोलावण्यात आलं होतं आणि सुधा मूर्तीही तिथे उपस्थित होत्या. सुधा मूर्ती जावेद अख्तर यांना पाहताच तिथे गेल्या आणि त्यांच्या पाया पडल्या. जावेद अख्तर यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही सुधा यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. रेडएफएम जयपूरने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सुधा मूर्ती यांच्या साधेपणाचे खूप कौतुक होत आहे.
पाहा व्हिडीओ –
अनेक सोशल मीडिया यूजर्सनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, ‘आम्हाला आमच्या भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे.’ दुसऱ्याने लिहिलं, ‘एखाद्या व्यक्तीची महानता त्याच्या वागण्यावर आणि विचारांवर अवलंबून असते.’ तर, ‘सुधा मूर्ती एक सुसंस्कृत भारतीय स्त्री आहेत,’ अशी कमेंट एका युजरने केली. ‘सुधा मूर्ती जी या खऱ्या सुसंस्कृत भारतीय स्त्री आहेत, संपूर्ण देश त्यांना आदर्श मानतो. त्या एक आदर्श स्त्री आहेत,’ असं एक युजर म्हणाला.
जावेद अख्तर यांनी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये त्यांचे नवीन पुस्तक ‘ज्ञान सीपियां: पर्ल्स ऑफ विस्डम’ प्रकाशित केले. यावेळी सुधा मूर्ती आणि अभिनेता अतुल तिवारी उपस्थित होते. या सत्रात जावेद अख्तर यांनी शिक्षण, भाषा आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व यावर आपले विचार मांडले. तर, सुधा मूर्ती व त्यांच्या कन्या अक्षता मूर्ती यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल ३० जानेवारीपासून सुरू झाले आहे. ३ फेब्रुवारीला या फेस्टिव्हलचा समारोप होईल.