विक्रांत मॅसे आणि विधू विनोद चोप्रा यांच्या ‘१२वी फेल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच धुमाकूळ घातला आहे. २७ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला अन् त्यानंतर कंगनाचा ‘तेजस’ आला पण तरी विधु विनोद चोप्रा यांच्या या चित्रपटावर अजिबात परिणाम झालेला नाही. कंगनाचा ‘तेजस’ बॉक्स ऑफिसवर आपटला, पण ‘१२वी फेल’ अजूनही बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेला सलमान खानचा बिग बजेट ‘टायगर ३’देखील या चित्रपटाचं काहीच वाकडं करू शकलेला नाही. मीडिया रीपोर्टनुसार ‘१२ वी फेल’ने २१ दिवसांत तब्बल ३४ कोटींची कमाई केली आहे. अनुराग पाठक यांच्या ‘१२वी फेल’ या पुस्तकावर आधारित, हा चित्रपट यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या दोघांच्या कथेवर बेतलेला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१० कोटींची दमदार कमाई करत सुरुवात केली. ही चित्रपटाची कमाई अपेक्षेपेक्षा चांगली असल्याचे बोलले जात होते. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने २.५० कोटींची कमाई केली.
आणखी वाचा : KBC 15: “मी खरकटी भांडी घासली, अन्…” ‘केबीसी १५’च्या मंचावर बिग बी यांचा मोठा खुलासा
तिसऱ्या दिवशी ३.१० कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीकेंडला एकूण ६.७० कोटींची कमाई केली होती. आता सोमवारपासून चित्रपटाच्या कमाईत घट होणार अशी शक्यता बऱ्याच लोकांनी वर्तवली, पण याच्या अगदी उलट चित्र बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळालं. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने १३ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने १४.११ कोटींची कमाई केली.
या चित्रपटाकडून कोणालाही फारशी अपेक्षा नसतानासुद्धा बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने केलेली कमाई अद्भुत आहे. ‘१२वी फेल’चं बजेट २० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. हे आकडे लक्षात घेता चित्रपटाने बजेट पुन्हा रीकवर करत चांगलाच नफादेखील क मावला आहे. विधू विनोद चोप्रा यांनी बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक केला. समीक्षक आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला उचलून धरलं अन् यामुळेच हा चित्रपट ‘टायगर ३’समोरसुद्धा बॉक्स ऑफिसवर टिकून राहीला आहे.