‘मिर्जापुर’सारख्या वेबसीरिजमधून ‘बबलू भैय्या’ म्हणून लोकप्रिय झालेला अभिनेता विक्रांत मस्से हा सध्या त्याच्या ‘१२ वी फेल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विधू विनोद चोप्रा यांनी बऱ्याच वर्षांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून कमबॅक केलं आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला ठीकठाक प्रतिसाद मिळाला असून प्रेक्षक या चित्रपटाचं अन् या कथानकाचं कौतुक करत आहेत.
विधू विनोद चोप्रा आणि विक्रांत या दोघांनी प्रथमच या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यासंदर्भात नुकतंच विक्रांतने भाष्य केलं आहे. ज्या वेबसीरिजमुळे विक्रांतला जगभरात ओळख मिळाली त्या ‘मिर्जापुर’ सीरिजबद्दल विधू विनोद चोप्रा यांचं मत काय आणि ते टी वेबसीरिज अद्याप पूर्ण का करू शकलेले नाहीत याबद्दल विक्रांतने खुलासा केला आहे.
‘लल्लनटॉप सिनेमा’शी संवाद साधतांना विक्रांतने त्याच्या आणि विधू विनोद चोप्रा यांच्या भेटीबद्दल माहीती दिली. विधू विनोद चोप्रा जेव्हा विक्रांतल भेटले तेव्हा ते म्हणाले, “मी तुझं फारसं काम पाहिलेलं नाही , काही एक दोन चित्रपट पाहिले असतील. तू ‘गुंज’ या चित्रपटात काम केलं होतंस, माझी पत्नी तुझ्या कामाची खूप प्रशंसा करते.” नंतर ‘मिर्जापुर’ या वेबसीरिजविषयी विधू विनोद चोप्रा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दलही विक्रांतने खुलासा केला.
साऱ्या देशाने या सीरिजला डोक्यावर घेतलं पण विधू विनोद यांच्या मते ही सीरिज अत्यंत बेकार असल्याचं विक्रांतने सांगितलं. त्या सीरिजविषयी विधू विनोद चोप्रा विक्रांतला म्हणाले, “मी तुझी ‘मिर्जापुर’ ही सीरिजही पाहायचा प्रयत्न केला, पण ती सीरिज अत्यंत टुकार आहे. मी त्याचा दूसरा एपिसोडपर्यंत पाहिलं पण मला पुढे पहावंसं वाटलं नसल्याने मी ती सीरिज अर्धवट सोडून दिली.” विक्रांतचं पात्र ‘मिर्जापुर’च्या पहिल्या सीझनमध्येच मरण पावतं. त्यानंतर आलेला याचा दूसरा सीझनसुद्धा लोकांनी डोक्यावर घेतला. आता सगळेच ‘मिर्जापुर ३’ची आतुरतेने वाट बघत आहेत.