१९८९ साली ‘परिंदा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. भारतीय चित्रपटविश्वात या चित्रपटाचं योगदान बरंच मोठं आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, अनिल कपूर व जॅकी श्रॉफ, नाना पाटेकरसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चारही कालाकारांच्या करिअरला या चित्रपटामुळे एक वेगळंच वळण मिळाले. याबरोबरच दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्यासाठीसुद्धा हा चित्रपट चांगलाच महत्त्वाचा होता. नुकतंच विधू विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाशी जोडलेल्या काही आठवणी शेअर केल्या.
यूट्यूब चॅनल ‘गल्लाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विधू विनोद चोप्रा यांनी ‘परिंदा’विषयी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. चित्रपटाच्या शेवटी जॅकी श्रॉफ यांच्या पात्राला जीवे मारण्यासाठी विधू विनोद यांना तब्बल १० लाख रुपये द्यायचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावेळी चित्रपटगृहांचे मालक आणि वितरक यांनी या चित्रपटात बरेच बदल करण्यास सांगितले होते, पण विधू विनोद यांनी ते बदल केले नाहीत व ते आपल्या मतावर ठाम होते.
आणखी वाचा : पांढरा शर्ट, डोळ्यांवर चश्मा अन् हातात बंदूक; शाहिद कपूरच्या आगामी ‘देवा’मधील डॅशिंग लूक व्हायरल
याविषयी सांगताना विधु विनोद चोप्रा म्हणाले, “जेव्हा मी ‘परिंदा’बनवला तेव्हा माझ्याकडे फारसे पैसे नव्हते. वितरकांनी त्यावेळी चित्रपट पाहून मला १० लाख रुपयांची ऑफर दिली, पण त्यांनी शेवटी अनिल कपूर व माधुरी दीक्षितच्या पात्राऐवजी जॅकी श्रॉफच्या पात्राला जीवे मारण्यास सांगितले. मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी मला कारण विचारल्यावर मी त्यांना सांगितलं की मी जॅकीचे पात्र मृत्युमुखी पडताना दाखवलं तर मी चित्रपटातून जे सांगू पहात आहे ते शक्य होणार नाही. हिंसेतून केवळ हिंसाच निर्माण होते ही गोष्ट मी ठळकपणे मांडू शकणार नाही.”
विधू विनोद यांच्यामते ‘परिंदा’ हा एक खूप प्रामाणिक चित्रपट आहे आणि प्रत्येक चित्रपट ते त्याच प्रामाणिकपणे सादर करायचा प्रयत्न करतात. ‘परिंदा’ला त्यावेळी भारतातही बरेच पुरस्कार मिळाले व हा चित्रपट ऑस्करसाठीही पाठवण्यात आला होता. नाना पाटेकर यांना या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. २०१५ मध्ये विधू यांनी खास हॉलिवूडसाठी पुन्हा ‘परिंदा’ हा चित्रपट केला ज्याचं नाव होतं ‘ब्रोकन हॉर्सेस’. नुकताच विधू विनोद चोप्रा यांचा ‘१२ वी फेल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे ज्याला ठीकठाक प्रतिसाद मिळत आहे.