विद्या बालनने बॉलीवूड इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहमीपेक्षा काहीसं हटके कथानक आणि नवीन आशयांच्या चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणून विद्याला ओळखलं जातं. ‘भूल भुलैया’, ‘कहाणी’, ‘द दर्टी पिक्चर’, ‘परिणीता’, ‘लगे रहो मुन्ना भाई’ अशा एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये विद्याने काम केलेलं आहे. यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात विद्या बालन सिनेविश्वापासून काहिशी दूर होती. यानंतर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या ३’ या सिनेमातून तिने पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दमदार पुनरागमन केलं.
विद्या अभिनय क्षेत्राच्या बरोबरीने आता सोशल मीडियावर सुद्धा चांगलीच सक्रिय झाली आहे. ती विविध रील्स व्हिडीओ शेअर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. नुकताच विद्याने मराठमोळ्या अंदाजात एक डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री ‘नवरी नटली…’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
विद्या बालन तिच्या सोशल मीडियावर अनेकदा मराठी रील्स शेअर करत असते. मध्यंतरी अभिनेत्रीने मराठी विनोदवीर भाऊ कदमच्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधील गाजलेल्या स्किटवर मजेशीर व्हिडीओ बनवला होता. आता विद्याने लोकप्रिय मराठी गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्याच्या काळात सोशल मीडियावर अनेक जुनी गाणी ट्रेंड होत आहेत. “खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली काल बाई सुपारी फुटली” या गाण्यावर सुंदर असे एक्स्प्रेशन्स देत विद्या बालनने डान्स केला आहे.
सुंदर अशी ऑरेंज रंगाची साडी, कानात मोठे कानातले आणि कपाळावर चंद्रकोर टिकली अशा मराठमोळ्या अंदाजात विद्या बालन ‘नवरी नटली, सुपारी फुटली’ या गाण्यावर थिरकली आहे. तिचे कमाल एक्स्प्रेशन्स पाहून चाहते सुद्धा भारावून गेले आहेत.
विद्या बालनच्या व्हिडीओवर, “अगं बाई किती सुंदर” अशी कमेंट अभिनेत्री क्रांती रेडकरने केली आहे. तर अमृता खानविलकर, स्वाती देवल, खुशबू उपाध्याय या अभिनेत्रींनी कमेंट्स करत विद्याचं कौतुक केलं आहे. दरम्यान, विद्याच्या या डान्स व्हिडीओला एक दिवसाच्या आत तब्बल १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, आता ‘भुल भुलैय्या ३’नंतर विद्या बालन नवीन कोणत्या प्रोजेक्टमध्ये झळकणार हे पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर आहेत.