आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘दो और दो प्यार’ येत्या शुक्रवारी म्हणजेच १९ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे विद्या बालन पुन्हा एकदा नवी भूमिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विद्या बालन आणि अभिनेता प्रतीक गांधीने इन्स्टंट बॉलीवूडला भेट दिली.
नुकत्याच ‘इन्स्टंट बॉलीवूड’ला दिलेल्या मुलाखतीत विद्याने आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितलं. मुलाखतदाराने पहिल्यांदा प्रेमात पडल्याचा किस्सा विचारला असता विद्या म्हणाली, “मी जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडले तेव्हा मी १५ वर्षांची होते. ते फक्त आकर्षण होतं आणि प्रेम नव्हतं. पण तेव्हा मला वाटायचं की, मला माझं प्रेम मिळालं आहे. आता याच्याबरोबरच लग्न, याच्याबरोबरच आयुष्य घालवणार आणि हेच माझं नशीब आहे. नंतर काही दिवसांनी मला त्याची वेगळीच बाजू दिसली आणि मला ते आवडलं नाही, पटलं नाही, मग मी त्याचा विचार सोडून दिला.”
पहिल्यांदा झालेल्या हार्टब्रेकबद्दलही विद्या बालनने सांगितलं. ती म्हणाली, “मी ज्या मुलाला पहिल्यांदा डेट केलेलं त्याने माझं हार्टब्रेक केलं, कारण त्याने मला फसवलं होतं. आमचं नुकतचं ब्रेकअप झालेलं आणि व्हॅलेन्टाईन्स डेला तो मला कॉलेजमध्ये दिसला. आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. तो मला म्हणाला की, मी माझ्या एक्स गर्लफ्रेंडबरोबर डेटला जातोय. मी यावर त्याला ओके म्हटलं. कारण तेव्हा मला खूप त्रास झाला होता. मी सांगूही शकत नाही इतकं वाईट वाटलेलं मला.”
चित्रपटातील विद्या बालनचा सहकलाकार प्रतीक गांधीनेही त्याच्या प्रेमाबद्दल सांगितलं. प्रतीक एकदाच प्रेमात पडला आणि दोन वर्षे मागे लागून त्याने त्याची पत्नी भामिनी ओझाशीचं लग्न केलं.
दरम्यान, शीर्षा गुहा ठाकुरता दिग्दर्शित ‘दो और दो प्यार’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, या चित्रपटात विद्या बालनसह प्रतीक गांधी, इलिआना डिक्रुझ, सेंधिल राममूर्ती यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. १९ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.