‘भूल भुलैया’च्या पहिल्या दोन धमाकेदार भागानंतर आता चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. ‘भूल भुलैया ३'(Bhool Bhulaiyaa 3) मध्ये दिग्गज कलाकार अभिनय करताना दिसणार आहेत. मात्र, चित्रपटाआधीच माधुरी दीक्षित आणि विद्या बालन या अभिनेत्रींनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शुक्रवारी (२५ ऑक्टोबर ) रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये ‘आमी जे तोमार ३.o’ या गाण्यावर त्यांनी या दोन्ही अभिनेत्रींनी डान्स केला आहे. हा डान्स करताना विद्या बालन स्टेजवर खाली पडली; मात्र तिने ज्या पद्धतीने पुन्हा डान्स करायला सुरुवात केली. त्यामुळे अभिनेत्रीचे कौतुक होताना दिसत आहे.
विद्या बालनचे कौतुक
विद्या बालन आणि माधुरी दीक्षितच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यावेळी डान्स करताना विद्या खाली पडली त्यावेळी डान्स न थांबविता माधुरी आणि विद्या यांनी एकमेकींना साथ देत पुढचे सादरीकरण केले. हे सर्व पाहून या दोन्ही अभिनेत्रींचे मोठे कौतुक होत आहे.
‘आमी जे तोमार’ हे गाणे श्रेया घोषालने गायले असून, अमाल मलिकने संगीत दिले आहे.
‘भूल भुलैया ३’बद्दल बोलायचे तर हा चित्रपट शतकानुशतके जुन्या वाड्यात राहणाऱ्या मंजुलिकाच्या आत्म्याबद्दल आहे. ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले की, विद्या बालनचे पात्र ओरडत म्हणते, “मी मंजुलिका”. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा ‘भूल भुलैया २’मधील रुहान म्हणजेच रूहबाबाची भूमिका साकारत आहे. माधुरी ही दुसरी मंजुलिका आहे, जिच्या येण्याने चित्रपटात ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
या चित्रपटात कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित व विद्या बालन यांच्याबरोबर तृप्ती डिमरीदेखील अभिनय करताना दिसणार आहे. राजपाल यादव, विजय राज, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा, मनीष वाधवा, रोज सरदाना, कांचन मलिक आणि इतर कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले असून, भूषण कुमार, कृष्ण कुमार व मुराद खेतानी हे ‘भूल भुलैय्या’चे सहनिर्माते आहेत.
हेही वाचा: “तुम्ही खूप खालचा स्तर…,” नसीरुद्दीन शाह यांनी दिवंगत वडिलांचा अपमान केल्यावर भडकलेली ट्विंकल खन्ना
दरम्यान, माधुरीने कार्तिक आर्यनचे काम, त्याची मेहनत, शिकण्याची क्षमता या त्याच्या गुणांसह तो ज्या पद्धतीने काम करतो, त्याचे कौतुक केल्याचे एक व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. माधुरी दीक्षितकडून स्वत:चे कौतुक ऐकल्यानंतर आता मी गावी जायला तयार आहे, असे कार्तिक आर्यन म्हणताना दिसत आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd