प्रचंड संघर्षानंतर सिने जगतात यश मिळविणारी अभिनेत्री विद्या बालन हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट व हटके चित्रपट केले आहे. यापैकी एक चित्रपट अवघ्या आठ कोटींमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
विद्या बालनने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट फक्त आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सुपरहिट करून दाखवले. एखाद्या अभिनेत्याबरोबर अभिनेत्रीची सहायक भूमिका करण्याऐवजी तिने महिला केंद्रित सिनेमे केले. अशाच तिच्या एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रमही रचले होते. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा खूप जास्त कमाई केली. उत्तम पटकथा आणि विद्याचा जबरदस्त अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू. हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता.
आतापर्यंत विद्या बालनच्या ज्या चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल आम्ही बोलत होतो, त्या चित्रपटाचं नाव ‘कहानी’ आहे. यामध्ये ती एका गर्भवती महिलेच्या भूमिकेत दिसली होती. यात ती आपल्या हरवलेल्या पतीचा शोध घेण्यासाठी कोलकात्यात गेली होती. या संपूर्ण चित्रपटात तिचं खरं नाव, तिच्या पतीचं खरं नाव आणि विद्या बालनच्या कृतीमागचा खरा हेतू समजणं सोपं नव्हतं. हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा होता. या चित्रपटातील विद्या बालनशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीची महत्त्वाची भूमिका होती.
‘कहानी’ चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी फक्त आठ कोटी रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १०८ कोटींची कमाई केली होती. इतक्या कमी बजेटच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केलं होतं. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा सिक्वेल २०१६ मध्ये आला होता. या चित्रपटानेही चांगली कामगिरी केली होती.