बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने विविध भूमिका साकारत तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. विद्या बालनचा ‘दो और दो प्यार’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशन्सदरम्यान ती अनेक मुलाखतींमध्ये दिसली. अभिनेत्रीने नुकत्याच एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. विद्याने अनेक विषयांवर या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. अध्यात्म, धर्म याबद्दल ती आवर्जून बोलली आहे.
‘अनफिल्टर्ड बाय समदिश’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत “जर तुमच्याकडे खूप पैसा असेल तर तुम्ही कोणावर परोपकार कराल”, असा मुलाखतकर्त्याने प्रश्न विचारला असता विद्या म्हणाली, “आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण या तीन गोष्टी मला फार महत्त्वाच्या वाटतात. जर माझ्याकडे कोणी धार्मिक कामासाठी देणगी मागितली तर मी अजिबात देणार नाही. पण, जर कोणी आरोग्य केंद्र, शाळा किंवा टॉयलेटसाठी माझी मदत मागितली तर मी ती आनंदाने करेन.”
“मी खूप आध्यात्मिक व्यक्ती आहे, मी रोज पूजा करते. मी देवाकडे प्रार्थना करते. मी गणपतीची भक्त आहे, कारण मला हत्ती आवडतात आणि लहानपणी आपण ज्या गणपतीच्या गोष्टी ऐकतो त्यामुळे. काली, दुर्गा या देवींवर माझी अपार भक्ती आहे.”
“मी आध्यात्मिक आहे, पण धार्मिक नाही. मी कोणत्याही विधी पाळत नाही. मी माझ्या चालीरिती, विधी पाळते. अर्थात लहानपणापासून ज्या प्रार्थना, श्लोक मी माझ्या आईकडून शिकलेय त्या करतेच. पण, हेच करायचं तेच करायचं असं मला जमत नाही. मला जे हवय, जे वाटतं तेच मी करते.”
“जे लोक सांगतात हे नाही करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे, मला या सगळ्या अर्थशून्य गोष्टी वाटतात.”
“माझा त्या ऊर्जेवर, शक्तीवर विश्वास आहे. मला विश्वास आहे की, आपल्यापैकी प्रत्येकामध्ये देव आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीत देव आहे.”
दरम्यान, विद्या बालनचा चित्रपट ‘दो और दो प्यार’ १९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात विद्या बालनसह प्रतीक गांधी, इलिआना डिक्रुझ, सेंधिल राममूर्ती यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.