अभिनेत्री विद्या बालन सध्या ‘भुलभूलैय्या ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिची मंजोलिकाची भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या चित्रपटातील आधीच्या भागातदेखील तिच्या भूमिकेचे कौतुक होताना दिसले होते. ‘नीयत’, ‘दो और दो प्यार’, ‘शेरनी’, ‘शंकुतला देवी’, ‘मिशन मंगल’, ‘नटखट’, ‘तुम्हारी सुलु’, ‘बेगम जान’, ‘कहानी २’, ‘एक अलबेला’, ‘बॉबी जासूस’, ‘शादी के साइड इफेक्ट्स’ अशा अनेक चित्रपटांतून अभिनेत्रीने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता एका मुलाखतीत विद्या बालनने तिला करिअरच्या सुरुवातीच्या काळात कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला याचा खुलासा केला आहे.
विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”
अभिनेत्री विद्या बालनने नुकतीच कार्तिक आर्यनबरोबर ‘इन्स्टंट बॉलीवूडला’ मुलाखत दिली. या मुलाखतीत विचारण्यात आले की, तुमच्या आयुष्यात अशी कोणती परिस्थिती होती, ज्यावेळी तुम्हाला वाटले की त्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जाऊ शकणार नाही. यावर उत्तर देताना विद्या बालनने म्हटले, ” माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला नकाराचा खूप सामना करावा लागला. मला कोणत्याही चित्रपटात घेतले जात नव्हते. तो काळ खूप कठीण होता. मी एका मल्याळम चित्रपटात काम करत होते. त्याचे शूटिंग सुरू झाले मात्र ते मध्येच बंद पडले. त्यानंतर त्यांनी म्हणायला सुरुवात केली, ही मुलगी पनवती आहे. जेव्हापासून ही या चित्रपटाचा भाग बनली आहे, काही ना काही अडचणी येत आहेत आणि आता तर शूटिंगच बंद पडले; तर मला वाटते, खूप चित्रपटातून मला या कारणासाठी बाहेर काढण्यात आले. मी त्यावर विश्वास ठेवायला लागले. मी विचार करायला लागले की, मी खरंच पनवती तर नाही? अशा काळात तुम्ही विचार करता की तुमची स्वप्नं कधी पूर्णच होणार नाहीत, तो सर्वात कठीण काळ होता”, असे म्हणत विद्या बालनने संघर्षाच्या काळातील आठवण सांगितली आहे.
काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनने एका मुलाखतीत बॉलीवूडमध्ये सात वर्षे काम केल्यानंतर ज्या घरात मी राहत होतो, त्याचे भाडे द्यायला पैसे नव्हते. त्यावेळी मी खूप संघर्ष करत होतो, अशी आठवण सांगितली आहे.
दरम्यान, भुलभुलैय्या २ चित्रपटाची मोठी चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, कार्तिक आर्यन आणि विद्या बालन यांच्याबरोबरच माधुरी दीक्षितदेखील मुख्य भूमिकेत आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd