विजय देवरकोंडा व अनन्या पांडेचा ‘लायगर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. चित्रपटाचा ट्रेलर जिथपासून प्रदर्शित झाला तिथपासूनच ‘बॉयकॉट लायगर’ हा ट्रेंड सुरु झाला. पण चित्रपटावर याचा परिणाम होणार नाही असंही बोललं जात होतं. विजयचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचंही या चित्रपटाशी नाव जोडलं होतं. तो या चित्रपटाचा सहनिर्माता होता. आता विजय-करण पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.
पुरी जगनाथ यांनी ‘लायगर’चं दिग्दर्शन केलं. चित्रपटाला अपयश मिळाल्यानंतर विजय व पुरी जगनाथ यांचं काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा होती. मात्र करणने विजयची साथ सोडली नाही. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार करण व विजय पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
करण स्वतः एका नव्या हिंदी चित्रपटाची निर्माती करत आहे. या चित्रपटाबाबत करण व विजयमध्ये बोलणं झालं असल्याच्याही चर्चा आहे. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. विजयच्या अॅक्शनपट चित्रपटाला प्रेक्षकांनी ना पसंती दर्शवली होती. म्हणून आता पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चित्रपट करण्याचं दोघांनीही टाळलं आहे.
‘लायगर’च्या अपयशानंतर विजयने एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान याबाबत भाष्य केलं होतं. “आपल्या सगळ्यांचेच काही चांगले तर काही वाईट दिवस असतात. पण आपल्याला काहीही वाटत असलं तरी पुन्हा नव्या जोमाने काम करावंच लागतं.” असं विजय म्हणाला होता.