विजय सेतुपती हा सध्याचा दक्षिणेतील एकमेव स्टार आहे ज्याने एकाहून एक जबरदस्त हिट चित्रपट दिले आहेत. शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’मध्ये विजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच चित्रपटाच्या टीझरमधून त्याचा लूक समोर आला होता. आता शाहरुख खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत जवान चित्रपटातील विजय सेतुपतीचा लूक प्रदर्शित केला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये खूप चर्चा होत आहे. विजयचे चाहते त्याच्या या खास लूकची प्रशंसा करत आहेत.
नुकतंच विजय सेतुपतीने ‘जवान’ हा चित्रपट का करत आहे यामागील कारण स्पष्ट केलं होतं. विजय सेतुपतीने स्वत: एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्याने एटलीचा ‘जवान’मध्ये काम करण्यासाठी फक्त शाहरुख खानमुळे होकार दिला. शाहरुखबरोबर काम करायची संधी विजयला गमवायची नव्हती. इतकंच नव्हे तर यासाठी तो कोणतेही मानधन न घेता या चित्रपटात काम करण्यासही तयार होता असंही या मुलाखतीमधून स्पष्ट झालं होतं.
काही दिवसांपूर्वी ‘जवान’ चित्रपटातील शाहरुखचा लूकही प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘जवान’ चित्रपटाचा प्रिव्ह्यूही प्रदर्शित करण्यात आला होता. प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर नेटकरी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. जवान ‘पठाण’चे सगळे रेकॉर्ड हा चित्रपट मोडीत काढणार अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे. ७ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात शाहरुख खानसह नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, गिरिजा ओके गोडबोले, सुनील ग्रोव्हर आणि दीपिका पदूकोण हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.