Vijay Varma Sunidhi Chauhan: अभिनेता विजय वर्माने शुक्रवारी मुंबईत इंडियन एक्सप्रेसच्या ‘स्क्रीन’ मॅगझिनच्या लाँचिंग सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी विजयने त्याला विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरं दिली. पडद्यावर नकारात्मक भूमिका केल्यानंतर खऱ्या आयुष्यात त्याचा कसा त्रास झाला, याचा खुलासा विजयने केला. सुंदर मुली आणि त्यांच्या आई त्याला म्हणाल्या की त्या विजयला घाबरतात, या गोष्टीचा त्रास झाला. विजयने ‘डार्लिंग्स’, ‘पिंक’ आणि ‘दहाड’ या वेब सीरिजमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.

विजय म्हणाला, “अनेक माय-लेकींनी मला सांगितलं की त्या मला घाबरतात. या गोष्टीचा मला त्रास झाला. मी साकारलेल्या अत्यंत नकारात्मक भूमिकांची सुरुवात ‘पिंक’पासून झाली. ती भूमिका लहान होती, मात्र मला स्पष्ट आठवतंय कारण ते स्क्रीनिंग महिलांसाठी ठेवण्यात आले होते. सर्व अभिनेत्री तिथे उपस्थित होत्या. तिथे मी त्या लोकांना माझ्यासमोर बघत होतो, ज्यांना आधी मी फक्त पडद्यावर पाहिलं होतं.”

हेही वाचा – ‘स्त्री २’च्या यशानंतर ‘स्त्री ३’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस, श्रद्धा कपूरने दिली ‘ही’ मोठी अपडेट; म्हणाली…

विजय वर्माने सांगितला सुनिधी चौहानबरोबरचा अनुभव

‘पिंक’च्या स्क्रीनिंगमध्ये विजयने गायिका सुनिधी चौहानबरोबरच्या त्याच्या भेटीचा अनुभव सांगितला. “स्क्रीनिंगपूर्वी सर्वजण आनंदी दिसत होते, मात्र स्क्रीनिंग संपल्यावर काही जण रडत होते आणि तिथून जायला तयार नव्हते. मी सुनिधी चौहानचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण ती मला म्हणाली, ‘माझ्या जवळ येऊ नकोस. मला तुझी खूप भीती वाटते.’ मी म्हटलं, ‘देवा, काय झालं?’ मग दिग्दर्शकाने मला बाजूला बोलावून सांगितलं की मी चांगलं काम केलं आहे,” असं विजय म्हणाला.

हेही वाचा – Salim Khan : काळवीट शिकार प्रकरणाबाबत सलीम खान यांचं महत्त्वाचं वक्तव्य, “सलमान या प्रकरणात…”

IC 814: द कंदाहार हायजॅक व कालकूटसारख्या भूमिकांमुळे ही प्रतिमा बदलल्याचं विजय वर्माने सांगितलं. या सीरिजमध्ये त्याला या नकारात्मक भूमिकांपासून वेगळं काम करण्याची संधी मिळाली, असं त्याने नमूद केलं.

विजय वर्मा (फोटो – द इंडियन एक्सप्रेस)

२०२० मध्ये आलेल्या झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्यानंतर विजय वर्माला ओळख मिळाली. त्याने अनेक चित्रपट व सीरिजमध्ये काम केलं आहे. त्याने काही चित्रपट व सीरिजमध्ये नकारात्मक भूमिका केल्या. या नकारात्मक भूमिकांचा त्रास झाला, मात्र करिअरमध्ये इतर चांगल्या भूमिका करण्याची संधी मिळाल्याने खलनायकाची प्रतिमा काहिशी पुसली गेली, असं त्याने सांगितलं.