ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट चार दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहून प्रेक्षक नाराज झाले आहेत. या चित्रपटावर सर्वत्र टीका केली जात आहे. प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनीदेखील या चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केली. कुणी रामानंद सागर यांचं रामायण श्रेष्ठ सांगितलं तर काहींनी जपानी दिग्दर्शकाने केलेल्या चित्रपटाचे दाखले दिले. या सगळ्यांसमोर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट किती चुकीचा आहे हे प्रत्येक जण सोशल मीडियावर स्पष्ट करून सांगत आहे.
अशातच आता निर्माते दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी त्यांच्या आजोबांच्या १९४३ मधील रामायणावर आधारित चित्रपटाची आठवण करून दिली आहे. इतकंच नव्हे हा असा एकमेव चित्रपट आहे जो महात्मा गांधी यांनी बघितल्याचा दावाही विक्रम भट्ट यांनी केला आहे. याबद्दल एक पोस्ट शेअर करत विक्रम भट्ट यांनी ही माहिती दिली आहे.
आणखी वाचा : ‘बाहुबली’नंतर आलेला प्रभासचा एकही चित्रपट सुपरहीट का ठरला नाही? ही आहेत चार प्रमुख कारणं
‘टाईम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना विक्रम भट्ट यांनी गांधीजी यांनी विक्रम यांचे आजोबा विजय भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राम राज्य’ या चित्रपटाच्या प्रीव्यूला हजेरी लावल्याचं स्पष्ट केलं. पुढे विक्रम म्हणाले, “त्यावेळी गांधीजी यांचे मौन व्रत होते, अन् त्यांच्याकडे केवळ ४० मिनिटांचाच वेळ होता. माझ्या आजोबांना त्यांच्या बाजूला बसून तो चित्रपट दाखवण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. गांधीजी स्वतः रामभक्त होते अन् त्यांना तो चित्रपट आवडणं हे तेव्हा यांच्या आजोबांसाठी खूप मोठं यश होतं.”
याबरोबरच हा चित्रपट अमेरिकेतही दाखवला गेल्याचं विक्रम यांनी स्पष्ट केलं. त्यावेळी ५ लाखात बनलेल्या या चित्रपटाने ५५ लाखांची कमाई केल्याचंही विक्रम यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे. त्या चित्रपटात प्रेम अदीब यांनी प्रभू श्रीराम यांची भूमिका निभावली होती अन् शोभना समर्थ यांनी सीता मातेची भूमिका साकारली होती. आपल्या पोस्टमध्ये विक्रम लिहितात “आमचे आजोबा आम्हाला सांगायचे की त्यावेळी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक त्यांच्या चपला चित्रपटगृहाबाहेर काढून जात असत. हा त्यांच्या देवावरील विश्वासाचा सर्वात मोठा पुरावा होता आणि हाच विश्वास त्याने आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जवळ बाळगला होता.काही चित्रपट हे मनोरंजनाच्याही पलीकडचे असतात.”