चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांनी त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी अदिती भट्टबद्दल भाष्य केलंय. तसेच अभिनेत्री सुश्मिता सेन व अमीषा पटेल यांच्याशी एकेकाळी असलेल्या अफेअरबद्दल मत मांडलं. त्यांचा २००६ मधील ‘आंखे’ हा चित्रपट सुश्मिताबरोबरचं अफेअर व पत्नीशी असलेलं नातं यावर थोडाफार आधारित होता, असा खुलासाही विक्रम यांनी केला आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत विक्रम म्हणाले, “हा चित्रपट अगदीच सत्य घटनेवर आधारित नव्हता. पण जे घडलं होतं त्यातल्या काही भावना यात दाखविल्या होत्या. त्या काल्पनिक कथेच्या माध्यमातून खऱ्या भावना मी दाखविल्या होत्या.” या विषयावर चित्रपट बनवल्याबद्दल पत्नी नाराज झाली नव्हती का? असं विचारलं असता विक्रम म्हणाले, “त्यामध्ये जर मी कोणावर दोषारोप केले असतील तर तो मीच आहे, मी सुश्मिताच्या चारित्र्याबद्दल बोलले नाही किंवा माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला दोष दिला नाही. मग कोणी नाराज का होईल? मला स्वतःला मारण्याचा अधिकार आहे.”
खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या
यामुळे सुश्मिता आपल्यावर नाराज होती की नाही याची कल्पना नसल्याचं विक्रम यांनी सांगितलं. “मला माहीत नाही. मी कधीच तिला विचारलं नाही. माझा माझ्या आयुष्यावर अधिकार आहे, पण इतरांच्या आयुष्यावर नाही. त्यामुळे जेव्हा मी ट्विटर थ्रेड्सवर लिहितो, तेव्हा ते माझं सत्य असतं. जे माझ्याबरोबर घडलं होतं,” असं ते म्हणाले.
“त्या त्रासाने मला खूप काही शिकवलंय. आज मी जिथे आहे, तिथे फक्त त्या त्रासामुळे आहे. या गोष्टीतून मी गेलो नसतो तर माझा आध्यात्मिक प्रवास असा नसता. आपण आपल्या जन्माच्या आधीच काही गोष्टी निवडतो आणि मला वाटतं की मी हे निवडलं होतं. मी हे मनापासून सांगतोय की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वीकारायला पाहिजे. जे काही घडलं तो माझा निर्णय होता आणि मी ते घडू दिलं होतं. माझ्या आयुष्यात जे घडलं, त्यापैकी काहीही माझ्या परवानगीशिवाय घडलं नव्हतं,” असं विक्रम भट्ट यांनी नमूद केलं.
विक्रम भट्ट सुश्मिता सेन व अमीषा पटेलबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी सुश्मिता सेनसोबतच्या अफेअरमुळे लहानपणीची मैत्रीण अदिती हिच्याबरोबरचं लग्नही मोडलं होतं. सुश्मितासोबतच्या नात्याबद्दल पश्चाताप आहे का, असं विचारल्यावर विक्रम म्हणाले, “मला आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप नाही. मी चुका केल्या आहेत, भरपूर केल्यात आणि मी त्या चुकांमधून काहीतरी नक्कीच शिकलोय पण कदाचित अजुन बरंच काही शिकण्यासारखं राहून गेलंय.”
विक्रम यांनी खुलासा केला की त्यांनी सुश्मिता आणि अमीषा या दोघींनाही माफी मागण्यासाठी फोन केला होता. “त्या दोघींना मी हे फोन कॉल्स खूप आधीच केले होते. म्हणूनच मी भट्टसाहेबांकडे (महेश भट्ट) गेलो होतो आणि ते फोन कॉल्सचा एक भाग होते. पण सुश्मिता, अमीषा… ही अशी नाती आहेत ज्यांच्याबद्दल माध्यमांमध्ये बोललं जात होतं पण माझी फक्त इतकीच नाती नव्हती. माझी आणखी काही नाती आहेत, माझ्या आयुष्यात आणखी काही लोक आले आणि आज माझ्या मनात त्या नात्यांबद्दल काहीही अपूर्ण राहिलेलं नाही. मला वाटतं की जर तुम्ही याकडे प्रवास म्हणून पाहिलं तर तुम्हाला क्लोजरची गरज भासत नाही,” असं विक्रम भट्ट यांनी नमूद केलं.