अभिनेता विक्रांत मॅस्सीने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली. एक स्वप्नवत वाटावा असा प्रवास करत हा अभिनेता सिनेमात मुख्य भूमिका करत आहे. विक्रांतचा अभिनय नेहमीच वास्तववादी भूमिकांना न्याय देतो. ‘१२ फेल’ या चित्रपटात विक्रांतने आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारली आणि ती प्रेक्षकांच्या मनाला भावली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सेक्टर ३६’ मध्येही विक्रांतने सत्य घटनेवर आधारित भूमिका साकारली. विक्रांतची अशीच आणखी एक सत्य घटनेवर आधारित भूमिका प्रेक्षकांना लवकरच मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ हा विक्रांतचा आगामी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट २००२ मध्ये गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेस आग प्रकरणावर आधारित आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आधी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. सुरुवातीला मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, त्यानंतर २ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यातही हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता विक्रांत मेस्सीने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे.
विक्रांतने आपल्या इन्स्टा हँडलवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख १५ नोव्हेंबर २०२४ असल्याचे जाहीर केले आहे. त्याने चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले असून त्याला “जळित वास्तव १५ नोव्हेंबर २०२४ रोजी बाहेर येणार”, हे कॅप्शन दिले आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरना यांनी केले आहे. या चित्रपटात २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा रेल्वेस्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या आगीच्या घटनेचा तपशील दाखवण्यात आला आहे.
हेही वाचा…Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
या चित्रपटात विक्रांत एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. विक्रांतबरोबर राशी खन्ना मुख्य भूमिकेत आहे, ती एका रिपोर्टरची भूमिका साकारत आहे. तसेच अभिनेत्री रिद्धी डोग्रा निवेदिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.