विक्रांत मॅसीने आज (२ डिसेंबर २०२४) अभिनयातून अचानक निवृत्ती जाहीर करून सर्वांना धक्का दिला. मात्र, त्याच्या आगामी ‘झिरो से रिस्टार्ट’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अगोदर ही घोषणा केल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आता त्याचा मधील सहकलाकार हर्षवर्धन राणेने देखील यावर प्रतिक्रिया देताना ही केवळ ‘पीआर स्ट्रॅटेजी’ असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे.
‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन राणेने विक्रांत मॅसीच्या निर्णयावर भाष्य करत म्हटले, “विक्रांत हा शांत आणि स्पष्ट विचारसरणी असलेला माणूस आहे. मी त्याच्या कामाच आणि काम करण्याच्या पद्धतीच खूप कौतुक करतो. ‘हसीन दिलरुबा’च्या शूटिंगदरम्यान त्याचा अभिनय पाहून खूप काही शिकायला मिळाले. मला आशा आहे की, तो पुन्हा चित्रपटांत काम करेन. आमिर खान सरांनी देखील एकदा त्याच्यासारखीच घोषणा केली होती. पण ते पुन्हा चित्रपटसृष्टीत आले मला आशा आहे की विक्रांत सुद्धा पुन्हा सिनेमात काम करताना दिसेल. हे कलाकार आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचे आहेत, आणि त्यांच्या उपस्थितीने भारतीय सिनेमा समृद्ध होतो. मी अशी प्रार्थना करतो की विक्रांतने केलेली निवृत्तीची घोषणा हा फक्त एखाद्या सिनेमासाठी त्याच्यावर निर्मात्याने लादलेला पीआर स्टंट असावा.”
आज सकाळी विक्रांत मॅसीने आपल्या ‘इन्स्टाग्राम’ अकाउंटवरून अभिनयातून निवृत्ती जाहीर केली. त्याने पोस्टमध्ये लिहिले, “माझ्यासाठी मागची काही वर्षे खूपच विलक्षण होती. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. पण, जसजसा मी आयुष्यात पुढे जात आहे, तसतसं मला जाणवतंय की, आता एक पती, वडील आणि अभिनेता म्हणूनही स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि घरी परतण्याची वेळ आली आहे. येत्या २०२५ मध्ये आपण एकदा एकमेकांना शेवटचं भेटू. शेवटचे दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी बरोबर घेऊन सर्वांचे पुन्हा एकदा आभार. मी तुमचा कायम ऋणी राहीन.”
विक्रांत मॅसी लवकरच विधू विनोद चोप्रा यांच्या ‘झिरो से रिस्टार्ट’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय, तो अमित जोशी यांच्या ‘यार जिगरी’ या चित्रपटात सनी सिंगबरोबर, तर संतोष सिंग यांच्या ‘आंखों की गुस्ताखियां’ या चित्रपटात शनाया कपूरबरोबर काम करत आहे. तर हर्षवर्धन राणे बाबतीत सांगाय झालं, तर तो ‘सनम तेरी कसम २’ मध्ये झळकणार आहे.