२०२३ मध्ये प्रदर्शित झालेला प्रभासचा बहुचर्चित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत होता. चित्रपटात रामायणाचं केलेलं विद्रूपीकरण यामुळे यावर प्रचंड टीका झाली. लोकांनी या चित्रपटाला प्रचंड विरोध केला. बॉक्स ऑफिसवर या बिग बजेट चित्रपटाला प्रचंड नुकसान झालं. आता एक वर्ष उलटून गेलं तरी या चित्रपटाची अजूनही चर्चा होत आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते व कुस्तीपटू दारा सिंह यांचा मुलगा विंदू दारा सिंहने ‘आदिपुरुष’वर भाष्य केलं आहे.
विंदू यांचे वडील दारा सिंह हे त्यांनी साकारलेल्या हनुमानाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत दारा सिंह यांनी साकारलेल्या हनुमानाच्या भूमिकेची प्रेक्षक आजही आठवण काढतात. विंदू दारा सिंह याने त्याच्या वडिलांच्या याच भूमिकेची आठवण काढताना नुकत्याच आलेल्या ‘आदिपुरुष’बद्दल भाष्य केलं आहे. इतकंच नव्हे तर त्याला ओम राऊत व मनोज मुंतशीरसारख्या कलाकारांकडून ही अपेक्षा नव्हती असंही स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा : गँगस्टरकडून घेतलेले पैसे, बायकोचे दागिने ठेवले गहाण; ‘बॉबी’साठी राज कपूर यांनी असं का केलेलं? जाणून घ्या
विंदू म्हणाला, “इतके उत्तम दिग्दर्शक आणि निर्माते एवढी मोठी घोडचूक करतात हे माझ्यासाठी फार धक्कादायक होतं. त्यांना जर पुढच्या पिढीपर्यंत रामायण पोहोचवायचे होते तर त्यांनी ते योग्य पद्धतीने दाखवायला हवे होते. हा चित्रपट पूर्णपणे गंडलेला होता, ही एक मोठी घोडचूक होती. मला यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. इतकंच नव्हे तर चित्रपटातील कित्येक कलाकारांनी मला स्वतः येऊन सांगितलं की चित्रीकरणादरम्यान त्यांनी स्वतः यातले काही संवाद बदलण्याची विनंती केली होती. मला खात्री आहे निर्माते पुन्हा अशी चूक कधीच करणार नाहीत.”
विंदूनेही आपल्या वडिलांप्रमाणे एका मालिकेत हनुमानाची भूमिका साकारली होती. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, “सोनी टेलिव्हिजनवरील ‘जर वीर हनुमान’ मालिकेत जेव्हा मला हनुमानाची भूमिका साकारायची संधी मिळाली तेव्हा माझ्या वडिलांना मला एक नियमावली आखून दिली. त्यांनी मला सांगितलं जेव्हा तू हनुमानाच्या वेशभुषेमध्ये असशील तेव्हा कोणतीही चुकीची गोष्ट खाऊ नकोस, कोणतेही चुकीचे विचार मनात आणू नकोस. मी बऱ्याचदा ही भूमिका साकारली आहे. आजही मला ही भूमिका करायला मिळाली तर मी माझ्या वडिलांनी सांगितलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करेन.”