पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगट(Vinesh Phogat) १०० ग्रॅम वजन जास्त झाल्याने अंतिम फेरीत अपात्र ठरली. त्यानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात होती. अनेकांनी तिला धीर देत तिने केलेल्या संघर्षाबद्दल विनेश फोगटचे कौतुकही केल्याचे पाहायला मिळाले. आता या सगळ्यात अभिनेत्री भाजपा खासदार हेमा मालिनी( Hema Malini) यांनी वजनावरून केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. आता त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर विनेशला ऑल्मिपिकमधील नायिका, असे म्हटले आहे.
काय म्हणाल्या हेमा मालिनी?
हेमा मालिनी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर विनेश फोगटचा फोटो शेअर करीत, “विनेश फोगट, संपू्र्ण देश तुझ्याबरोबर आहे. तू या ऑलिम्पिकची नायिका आहेस. हिंमत हारू नकोस. मोठ्या कामगिरीसाठी तू बनलेली असून, तुझ्यापुढे तुझे उज्ज्वल भविष्य आहे. फक्त धैर्याने पुढे जा”, असे म्हटले आहे.
अशी होती हेमा मालिनी यांची पहिली प्रतिक्रिया…
हेमा मालिनी म्हणाल्या होत्या, “खूप आश्चर्यकारक आणि विचित्र आहे आहे की, १०० ग्रॅम वजन जास्त झाल्याने विनेश फोगट अपात्र ठरली आहे. आपले वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. अभिनेत्री आणि महिला यांच्यासाठी हा चांगला धडा आहे. विनेश फोगट लगेच वजन कमी करू शकली असती, तर बरे झाले असते; पण आता तिला ती संधी मिळणार नाही.”
काय म्हणाले नेटकरी?
हेमा मालिनी यांनी दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले होते. त्यानंतर हेमा मालिनी यांनी विनेश फोगटचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करीत तिचे कौतुक आहे. मात्र नेटकऱ्यांना हेमा मालिनींचे वागणे आवडले नसल्याचे दिसत आहे. एका नेटकऱ्याने, “आता लोक ट्रोल करीत आहेत म्हणून पोस्ट शेअर केली”, असे म्हटले आहे. दुसऱ्या नेटकऱ्याने, “तुमची लाज वाटते”, असे म्हणत आपला राग व्यक्त केला आहे. एका युजरने, “तुम्ही दिलेली पहिली प्रतिक्रिया वाचून धक्का बसला होता. तुम्ही तुमच्याबद्दलचा सगळा आदर गमावला आहे”, असे म्हटले आहे.
त्याबरोबरच, “तुम्ही केलेले वक्तव्य अत्यंत लाजिरवाणे आहे.”, “तुम्ही केलेले वक्तव्य आम्ही पाहिले आहे.”, “आता चांगले वागण्याची गरज नाही.”, “आम्ही तुमच्यासारख्या लोकांना सत्तेत बसवलंय, हे आमच्यावरच प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे”, असे म्हणत नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटने आपल्या एक्स अकाउंटवर एका भावनिक पोस्ट लिहीत निवृत्ती जाहीर केली आहे.