‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गल्ला जमवला आहे. पण, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादात अडकलेल्या या चित्रपटावर अनेक जण टीकाही करत आहेत. नुकतंच ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांनीही हा प्रोपगंडा चित्रपट असल्याचं म्हटलं होतं. त्यावर चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले होते कमल हासन?
“मी तुम्हाला सांगितले होते हा प्रोपगंडा चित्रपट आहे आणि मी याच्या विरोधात आहे. केवळ चित्रपटाच्या लोगोवर किंवा पोस्टरच्या खाली सत्यघटनेवर आधारित असे लिहून उपयोग नाही. संबंधित घटना प्रत्यक्षात सुद्धा खरी असावी लागते,” असं कमल हासन ‘द केरला स्टोरी’बद्दल म्हणाले होते.
हेही वाचा – “मार खाऊ शकता” म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मी इतकंच म्हणेन…”
निर्माते विपुल शाह यांचं उत्तर
‘पीपिंगमून’च्या वृत्तानुसार, चित्रपट निर्माते विपुल शाह म्हणाले, “कमल हासन सर हे ज्येष्ठ अभिनेते आहेत, त्यांची कारकीर्द खूप मोठी आहे. ते माझे वरिष्ठ आहेत. त्यांच्या बोलण्यावर मी प्रतिक्रिया दिली तर त्यांचा अनादर होईल. पण, मी त्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी हा चित्रपट आधी बघावा. त्यानंतर त्यांनी मला फोन करावा किंवा मला भेटावं. आपण टेबलावर त्यावर बसून चर्चा करू. ते जे म्हणाले त्याला प्रतिसाद देण्याचा हा एक चांगला मार्ग असेल. त्यांना चित्रपटामुळे काही त्रास असेल, तर याबद्दल मला कोणतीही तक्रार नाही. पण, त्यांनी हा चित्रपट एकदा बघावा, मगच प्रतिक्रिया द्यावी.”
दरम्यान, केरळमधील महिलांचं धर्मांतर करून त्यांना आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत समाविष्ट केलं गेलं, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. यावरून ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर वाद झाला होता. आतापर्यंत नसीरुद्दीन शाह, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटावर टीका केली आहे.