Virat Kohli Anushka Sharma Housewarming : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या भारतात असून, नुकतेच ते अलिबागमध्ये जाताना दिसले होते. अनुष्का आणि विराट त्यांच्या अलिबागमधील नव्या घरात गेले होते. यानंतर ते मुंबईत परतले. या जोडप्याचे व्हायरल झालेले व्हिडीओ पाहिल्यानंतर, आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या नव्या व्हायरल व्हिडीओमध्ये अलिबागमधील त्यांच्या बंगल्याचे दृश्य दिसत आहे, ज्याला गृहप्रवेशाच्या आधी फुलांनी सजवले गेले आहे.
पापाराझी वरिंदर चावला यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या अलिबागमधील बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे दृश्य आहे. हे प्रवेशद्वार फुलांनी सजवले गेले असून, गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.
यापूर्वी, गेटवे ऑफ इंडियाच्या जेट्टीचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याने भरलेली बोट आणि पूजेसाठी पुजारी जाताना दिसले होते. त्यानंतर चाहत्यांनी तर्क लावला की विराट आणि अनुष्का आपल्या नव्या बंगल्यात गृहप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करत आहेत. २०२३ साली विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अलिबागमध्ये एक आलिशान व्हिला विकत घेतल्याचे वृत्त समोर आले होते. ‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार ही प्रॉपर्टी आवास लिव्हिंग या ठिकाणी असून, २,००० चौरस फुट क्षेत्रफळात आहे. या प्रॉपर्टीची किंमत सुमारे ६ कोटी रुपये आहे. विराट आणि अनुष्काच्या या व्हिलामध्ये ४०० चौरस फुटांचे स्विमिंग पूल आहे. याशिवाय, त्यांनी अलिबागमध्ये १९.२४ कोटी रुपयांचे फार्महाऊसही विकत घेतल्याचे सांगितले जाते.
पाहा व्हिडीओ –
विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१७ मध्ये इटलीमध्ये एका खासगी सोहळ्यात विवाह केला होता. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचा वामिकाचा जन्म झाला. तर त्यांचा दुसरा मुलगा, अकाय कोहली, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जन्माला आला.
हेही वाचा…Video: एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पोहोचले सैफ अली खानच्या घरी, तपासाचा व्हिडीओ आला समोर
अनुष्काला शेवटचे २०१८ साली आनंद एल. राय यांच्या ‘झिरो’ चित्रपटात पाहिले गेले होते. २०२२ मध्ये तिने ‘कला’ चित्रपटात एक छोटा कॅमिओ केला होता. चाहत्यांना आता तिच्या आगामी ‘चकदा एक्सप्रेस’ या बायोपीकची प्रतीक्षा आहे, ज्यामध्ये ती प्रसिद्ध क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांची भूमिका साकारणार आहे.