विराट कोहलीने यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नसली तरीही बार्बाडोसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात विराटकडून मॅचविनिंग खेळी पाहायला मिळाली. कोहलीच्या ७६ धावांच्या जोरावर भारताला अंतिम सामन्यात १७६ ही मोठी धावसंख्या उभारता आली. अखेर बुमराह, अक्षर पटेल यांच्या भेदक गोलंदाजीमुळे विश्वचषकाच्या या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत ‘टी-२० विश्वचषक २०२४’ चं जेतेपद पटकावलं आहे. विराट कोहली या अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला.

विराट कोहलीने या ऐतिहासिक विजयानंतर सर्वप्रथम आपल्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला. हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विराटने अनुष्काला मैदानातच व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी पत्नीशी संवाद साधताना कोहलीला अश्रू अनावर झाले होते. यानंतर आपल्या दोन्ही मुलांशी विराटने हसत-खेळत संवाद साधला. त्यांना चेहऱ्यावरचे मजेशीर हावभाव करून दाखवले. विराटचे डोळे यावेळी भरून आले होते. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा : “एका मॅचला इतके टर्निंग पॉईंट्स…”, भारताने टी-२० विश्वचषकावर कोरलं नाव, मराठी कलाकार झाले भावुक

विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबद्दल सांगायचं झालं, तर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पॉवरप्लेमध्ये भारताची ३ बाद ३४ अशी अवस्था झाली होती. यावेळी कोहलीने फलंदाजीची एक बाजू भक्कमपणे सांभाळली होती. अर्धशतक पूर्ण झाल्यावर त्याने वेग वाढवून आक्रमक फलंदाजी केली. अर्धशतकानंतरच्या ११ चेंडूंमध्ये विराटने २९ धावा केल्या. अखेर बुमराह, अक्षर पटेल, अर्शदीप, हार्दिक पंड्याच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे.

हेही वाचा : Virat Kohli T20 Retirement: विश्वविजेतेपदासह विराट कोहलीचा टी२० ला अलविदा, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय म्हणाला?

हेही वाचा : IND vs SA : सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’ने सामन्याला दिली कलाटणी, ज्यामुळे भारताने ११ वर्षानंतर ICC ट्रॉफीवर कोरलं नाव, पाहा VIDEO

दरम्यान, विश्वचषक जिंकल्यावर भारताचे सगळेच खेळाडू भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. विराटसह रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सिराज यांना मैदानात अश्रू अनावर झाले होते. कोहलीप्रमाणे हार्दिक पंड्याने देखील या ऐतिहासिक विजयानंतर त्याच्या कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल केला होता. सध्या भारतीय संघावर संपूर्ण देशभरातून व विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.