विशाल भारद्वाज यांची अलीकडेच ‘चार्ली चोप्रा’ नावाची वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. पुढच्या आठवड्यात ते नेटफ्लिक्सवर त्यांचा आगामी चित्रपट घेऊन येत आहे. ‘खुफिया’ नावाच्या या चित्रपटात तब्बू, वामिका गब्बी, अली फजल, अजमेरी हक आणि आशिष विद्यार्थी या कलाकारांची महत्त्वाची भूमिका आहे. विशाल भारद्वाज चित्रपटाच्या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती देत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी शाहरुख खानबद्दल भाष्य केलं आहे.
२०२३ ही वर्षं शाहरुखमय होतं ही गोष्ट आपण सगळेच मान्य करू. वर्षाच्या सुरुवातीला ‘पठाण’मधून शाहरुखने बॉक्स ऑफिसवर राडा घातला, पाठोपाठ सप्टेंबरमध्ये आलेल्या ‘जवान’ने तर पठाणला मागे टाकत एक वेगळाच इतिहास रचला. प्रेक्षकांनी तर चित्रपटाला डोक्यावर घेतलंच पण बॉलिवूडमधील लोकांनीही शाहरुखचं खूप कौतुक केलं. विशाल भारद्वाज यांनीही नुकतंच शाहरुखचं कौतुक केलं.
‘इंडिया टूडे कॉनक्लेव्ह’मध्ये विशाल भारद्वाज यांनी नुकतीच हजेरी लावली. यावेळी ‘पठाण’ आणि ‘जवान’बद्दल विषय निघताच विशाल भारद्वाज म्हणाले, “शाहरुखने जवानच्या माध्यमातून जे केलं आहे ते आम्ही दिग्दर्शक म्हणून कधीच करू शकत नाही. शाहरुखने फारच उत्तम चित्रपट बनवला आहे, त्याला जे मांडायचं आहे ते त्याने निर्भीडपणे मांडलं आहे. जवान पाहताना माझ्या मनात सतत एक भावना येत होती ती म्हणजे हा शाहरुख माझा हीरो आहे.”
‘जवान’मध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या, निवडणुकांच्या नावाखाली होणारी सामान्य जनतेची फसवणूक, वैद्यकीय क्षेत्रातील अनागोंदी यावर भाष्य केलेलं विशाल भारद्वाज यांना फार भावलं आहे. याबद्दलच विशाल यांनी कौतुक केलं आहे की शाहरुखने व्यावसायिक चित्रपटातून या सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे.