बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माचा ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो चित्रपटगृहात प्रदर्शित होईपर्यंत याची सातत्याने चर्चा सुरु आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.
सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरला स्टोरी या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या कथानकात केरळ राज्यातील मुलींची फसवणूक कशा पद्धतीने करण्यात आली होती, याचे वास्तव चित्रण दाखवण्यात आले आहे. केरळमधील दहशतवादी कटांवर आधारित हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये संधी कशी मिळाली? शिवाली परबने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “आगरी भाषा…”
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन एका ठिकाणी वाद सुरु आहे. या चित्रपटामुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे देशातील विविध राज्य सरकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या चित्रपटावर पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये बंदी घातली गेली आहे.
एकीकडे ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आता हरियाणा सरकारने हा चित्रपट करमुक्त दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विश्व हिंदू परिषदेने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी केली आहे.
‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.३ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने जवळपास १२ कोटी रुपये कमावले होते. त्याबरोबरच तिसऱ्या दिवशी चित्रपटाने सुमारे १६.५० कोटी, तर चौथ्या दिवशी या चित्रपटाने १०.५० कोटी रुपये कमावले होते. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने पाचव्या दिवशी ११ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे पाच दिवसात चित्रपटाने ५६. ७२ कोटींचा गल्ला जमवला आहे.