Vivah Movie Actress: ‘विवाह’ हा बॉलीवूडमधील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. २००६ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केलं होतं. यामध्ये शाहिद कपूर, अमृता राव, आलोक नाथ, अनुपम खेरसह अनेक कलाकार होते. या चित्रपटाची कथा साधी होती, पण प्रेक्षकांना ती खूप आवडली आणि त्यांनी चित्रपट डोक्यावर घेतला.
‘विवाह’ चित्रपटात अमृता रावने पूनम नावाची भूमिका केली होती. तर शाहिद कपूरने प्रेम हे पात्र साकारले होते. या चित्रपटात एका पात्राने खूप लक्ष वेधून घेतलं होतं. ती म्हणजे पूनमची बहीण ‘छोटी’. ‘विवाह’ चित्रपटात छोटीची भूमिका अभिनेत्री अमृता प्रकाशने साकारली होती. चित्रपटात सावळ्या रंगाची व साध्या लुकमध्ये दिसणारी ही अभिनेत्री १९ वर्षांनंतर कशी दिसते हे तुम्हाला माहितीये का? खरं तर आता अमृताला पाहिलं की ‘छोटी’च्या भूमिकेत तीच होती यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
अमृता दिसते खूपच सुंदर
अमृता प्रकाश सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती आता सुंदर व ग्लॅमरस दिसते. पारंपरिक व वेस्टर्न आउटफिटमधील तिच्या फोटोंना चाहत्यांची विशेष पसंती मिळते. अमृता तिच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे ९३ हजार फॉलोअर्स आहेत.
बालपणी केली करिअरची सुरुवात
अभिनेत्री अमृता प्रकाशने ४ वर्षांची असताना तिच्या करिअरला सुरुवात केली होती. विवाहमधील ‘छोटी’ने ‘तुम बिन’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. यानंतर तिने मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं. केवळ चित्रपटच नाही तर अभिनेत्री ‘डाबर’ आणि ‘ग्लुकॉन डी’ सारख्या अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्येही दिसली आहे. सोनी टीव्हीच्या ‘पटियाला बेब्स’ या शोमध्ये अमृता शेवटची दिसली होती. यानंतर, तिने रुबीना दिलैकबरोबर ‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’ या टीव्ही मालिकेत काम केलं होतं. यात तिने जसलीन ही भूमिका केली होती. तिच्या या भूमिकेची खूप चर्चा झाली होती.
अमृताचं प्रॉडक्शन हाऊस
अमृताने अनेक टीव्ही शो आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक प्रॉडक्शन हाऊस देखील चालवते, ज्या अंतर्गत टीव्ही जाहिरातींची निर्मिती केली जाते. अमृता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनत असलेल्या प्रोजेक्ट्सची माहितीही चाहत्यांना देत असते.