दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अजूनही संपायचं नाव घेत नाहीये. यावर्षीचा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’चं नाव सर्वात पहिले घेतलं जात आहे. या चित्रपटासाठी केलेल्या रिसर्चबद्दल नुकतंच विवेक अग्निहोत्री आणि अनुराग कश्यप यांच्यात वाद झाला आहे. ट्विटरच्या माध्यमातून या दोघांनी त्यांची मतं मांडली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान अनुराग कश्यपने ‘कांतारा’ आणि ‘पुष्पा’सारख्या चित्रपटांच्या यशाबाबत एक विधान केलं होतं. हे विधान बरंच चर्चेत होतं. ‘सैराट’, ‘कांतारा’ किंवा ‘पुष्पा’सारखे चित्रपट हे मनोरंजनसृष्टीचं नुकसान करत आहेत असं विधान अनुरागने केलं होतं. अर्थात अनुरागचा यामागचा उद्देश फार वेगळा होता. हे चित्रपट हीट ठरल्यावर संपूर्ण मनोरंजनसृष्टी अशाच चित्रपटांच्या पावलावर पाऊल टाकत चालते आणि हे खूप धोकादायक आहे असं अनुरागचं स्पष्टीकरण होतं.

आणखी वाचा : शाहरुख-दीपिकाच्या हॉट केमिस्ट्रीचा तडका असलेलं ‘पठाण’चं नवं गाणं नेटकऱ्यांचा निशाण्यावर; हृतिकच्या ‘या’ गाण्याशी होतीये तुलना

अनुरागच्या या विधानाचा एक फोटो विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केला आणि लिहिलं की, “मी या महाशयांशी सहमत नाही.” विवेक यांच्या या ट्वीटवर अनुरागने त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल टिप्पणी केली. विवेक यांना उत्तर देताना अनुराग म्हणाला, “सर तुमची चूक नाहीये. तुमच्या चित्रपटाचा रिसर्चसुद्धा या छोट्याश्या ट्वीटप्रमाणेच आहे. तुमची आणि तुम्हाला फॉलो करणाऱ्या मीडियाचीसुद्धा हीच परिस्थिती आहे. आत्ता खपवून घेतलं, पण यापुढे अशा विषयांवर जरा गांभीर्याने अभ्यास करा.” अनुरागने या ट्वीटमधून ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासाठी केलेला रिसर्च हा एकांगी आणि अर्धवट होता असं अनुरागला सूचित करायचं आहे.

यावर विवेक अग्निहोत्री यांनीसुद्धा अनुरागला चोख उत्तर दिलं आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “एवढं तुम्ही बोललाच आहात तर आता ही गोष्टदेखील सिद्ध करूनच दाखवा की ‘द काश्मीर फाइल्स’साठी केलेला ४ वर्षांचा रिसर्च खोटा आहे. गिरिजा टिकू, बीके गंजू, एयरफोर्सच्या लोकांची हत्या हे सगळं खोटं होतं. ७०० पंडितांचे व्हिडिओ जे आमच्याकडे आहेत तेसुद्धा खोटे आहेत. हिंदूंचा नरसंहार झालाच नाही. हे सगळं तुम्ही सिद्ध करून तर दाखवा, मग आमच्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही.” या ट्वीटमध्येसुद्धा अनुरागच्या नुकत्याच फ्लॉप झालेल्या ‘दोबारा’ चित्रपटावर खोचक टिप्पणी करत विवेक यांनी उत्तर दिलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ३०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. आता विवेक अग्निहोत्री कोविद लसीकरणाच्या मोहिमेमागील संघर्षावर चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. प्रेक्षक यासाठी उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek agnihotri and anurag kashyap takes a dig at each other on twitter about their films avn